लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकाटिप्पणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ या सदरामध्ये भारतीय जनता पक्षाबाबत गंभीर आरोप केले होते. ‘नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले’, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांना प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत संजय राऊतांनी यावरही भ्रष्टलेख लिहावा, असा खोचक सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

हेही वाचा : सोनिया दुहान यांची खंत, “शरद पवार दैवत, पण सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे मी पक्षात..”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं?

“संजय राऊत…तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात? आदरणीय मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. ‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचा एक १० सेंकदाचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ एका सभेतील असल्याचं दिसत असून त्यामध्ये ते जनतेला संबोधित करत असल्याचं दिसतं आहे. मात्र, त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे हे असं म्हणता आहेत की, “मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…”, त्याच्या या विधानावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे.

संजय राऊतांनी काय म्हटलं होतं?

संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये मोठा दावा केला होता. ते म्हणाले होते, “नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा, यासाठी मोदी-शाह-फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही, याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule criticizes to mp sanjay raut write a slanderous article on congress mallikarjun kharge gkt
Show comments