भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पर्यटनावर असताना त्यांचा कॅसिनोतील एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केला. महाराष्ट्र जळत असताना राज्यातील नेता मकाऊमध्ये असल्याची एक्स पोस्ट त्यांनी केली होती. त्या फोटोवरून राज्यात प्रचंड राजकारण झालं. तसंच, राऊंतांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले. आता या सर्व प्रश्नांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते भारतात परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मागच्या ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.
“पण यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आणि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केलं होतं. हाँकाँग या पर्यटनस्थळी गेलो. सगळं चांगंल चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटलं”, असंही ते म्हणाले.
“सगळ्यांनाच माहितेय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करावं लागतं. मकाऊ किंवा हाँककाँगला गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करूनच सगळीकडे जावं लागतं. कोणीतरी असे प्रयत्न करायचे आणि ३५० कोटींचा आरोप केला. एक रुपयाही तुमच्या बॅगेत असला तर तीन तीन वेळा चेकिंग करावी लागते”, असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं.