राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. सत्तेत एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना मुंबई महानगर पालिकेचे वेध लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांआधी भाजपा आणि मनसे यांची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चा वेळोवेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या असल्या, तरी अशी युती होणारच नाही, अशी स्पष्ट भूमिका मात्र अद्याप दोन्हीकडच्या कोणत्याही नेत्यांनी घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या विधानावरून चर्चा सुरू झाली आहे.
“राज ठाकरे मला मोठ्या भावासारखे”
चंद्रशेखर बावनकुळेंनी आज राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी भेटीचं कारण विचारलं असता ही कौटुंबीक भेट होती, असं ते म्हणाले. “मी फक्त राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलोय. याचा राजकीय अर्थ नाहीये. ते आमच्या मोठ्या भावासारखे आहेत. राज ठाकरेंनी आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात नेहमीच हजेरी लावली आहे. त्या दृष्टीने एक कौटुंबीक भेट घेण्यासाठी मी इथे आलो”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
“राज ठाकरे जेव्हापासून राजकारणात आले, तेव्हापासून ते महाराष्ट्र आणि हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. राज ठाकरेंचा मूळचा स्वभावच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे आज त्यांना आम्ही नव्याने भेटत आहोत असं काहीही नाही. त्यांना भेटण्यात काहीही गैर नाही”, असंही बावनकुळेंनी नमूद केलं आहे.
“मेट्रो कारशेडचा वाद पर्यावरणापेक्षा…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र!
“युतीचा निर्णय…”
दरम्यान, यावेळी बावनकुळेंना मनसे-भाजपा युतीसंदर्भात प्रश्न विचारताच त्यांनी सूचक विधान केलं. “मनसेशी युतीबाबतचा निर्णय आमचे वरीष्ठ नेते घेतात. केंद्रात अमित शाह, जे. पी. नड्डा, राज्यात देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेत असतात. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून भाजपा कसा वाढेल, हीच माझी जबाबदारी आहे. बाकी युती करणं, त्याबाबत भूमिका घेणं हे आमचे वरीष्ठ नेते ठरवतात”, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं.