पाटण्यामध्ये १९ विरोधी पक्ष नसून १९ पंतप्रधान जमले होते, अशी टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला होता. त्यावर आता भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. सत्ताधाऱ्यांची ही टीका म्हणजे पोरकटपणाचं भाष्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावर बावनकुळेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सविस्तर पोस्ट टाकली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. “हे पोरकटपणाचं भाष्य आहे. या संपूर्ण बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चाच झाली नाही. महागाई, बेकारी, समाजातील अंतर निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून कशी पावलं टाकली जात आहेत यावर चर्चा झाली. कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढल्यास ते समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे या सगळ्याला आवर घालण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे हा बैठकीत चर्चेचा विषय होता”, असं शरद पवार म्हणाले.
पवार म्हणतात, “त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव माझ्या लक्षात नाही!”
“मी बघतोय, गेले दोन-तीन दिवस अनेक तथाकथित नेते बोलत आहेत. हे लोक का जमले? यांनी बैठक का घेतली? वगैरे… लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही का? ते भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही…”, असं म्हणत शरद पवारांनी बावनकुळेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला! “ते म्हणाले बैठकांची गरज काय होती? दुसऱ्या दिवशी त्यांनीच त्यांच्या मित्रपक्षांची बैठक बोलावली. म्हणजे तुम्हाला बैठका घेता येतात, मग इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते? इथे प्रगल्भ राजकारणाची कमतरता आहे”, असं पवार म्हणाले.
“तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, म्हणून…”, ‘त्या’ विधानावर शरद पवारांची खोचक टीका!
दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. “आदरणीय पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्रं दिली यातच सर्व आलं”, असं बावनकुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे.मोदींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य चालू आहे. पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात. पण जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल”, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटच्या शेवटी दिला आहे.