राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद पाहायला मिळत असताना दुसरीकडे भाजपानं पुढील निवडणुकांच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांची विधानंही बरीच चर्चेत राहिली होती. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क सुरू होताच बावनकुळेंनी त्यावरून सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे गट या वादासोबतच बारामतीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा राज्यात पाहायला मिळत आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्याचाही सुप्रिया सुळेंनी यावेळी उल्लेख केला. “महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता. त्यानंतर दोन्ही खिशात काही नाही असं होतं. पण शरद पवार सोलापूरला गेल्यानंतर जी कुस्ती सुरु झाली, ती निकालाच्या दिवशीच संपली”, असं विधान सुप्रिया सुळेंनी इंदापुरात बोलताना केलं.
“पवारांच्या नावावर किती दिवस मोठे व्हाल?”
सुप्रिया सुळेंच्या या विधानावर बावनकुळेंनी टीव्ही ९ शी बोलताना पलटवार केला आहे. “तो काळ गेला आहे. शरद पवारांचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे”, असं बावनकुळे म्हणाले.
शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या “महाराष्ट्राचा एक दौरा…”
“मी बारामतीत जेव्हा गेलो, तेव्हा एवढंच म्हटलं की जर घड्याळ बंद पाडायचं असेल, तर बारामतीतून पाडा.कार्यकर्त्यांना मी आवाहन केलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंना आता रोज २५ गावं फिरावी लागत आहेत. बारामती या एकाच मतदारसंघात सरकार पोहोचलं आहे. बाकी पाचही विधानसभेत कोरी पाटी आहे. त्यामुळे तिथे प्रचंड नाराजी आहे. मला विश्वास आहे की ४५ हून अधिक लोकसभा आम्ही जिंकणार आहोत. त्यात बारामती क्रमांक एकवर असेल. तिथे कोणताही स्टार उमेदवार देण्याची गरज नाही. तिथे साधा उमेदवारही जिंकेल”, असा खोचक टोला बावनकुळेंनी बोलताना लगावला.