मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार कार्यक्रमातून गायब झाले होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आज अखेर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपण परदेशात खासगी दौऱ्यावर गेलो होतो, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नेमकं काय करतील? हे कुणालाच कळणार नाही. ते काय सांगतील आणि काय करतील, हे केवळ अजित पवारांनाच माहीत असतं, अशा आशयाचं विधान बावनकुळेंनी केलं आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही” नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान

अजित पवार नाराज असल्याने राज्यातील सत्तेची समीकरणं बदलतील का? असं विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “अजित पवार नेमकं काय करतील? हे ना तुम्हाला कळेल… ना आम्हाला कळेल… ते केव्हा बाहेर येतील आणि काय बोलतील, हे कुणीच सांगू शकत नाही. ते काय सांगतील आणि काय करतील, हेही केवळ अजित पवारांनाच माहीत असतं. ते भारतीय जनता पार्टीला कसं माहीत असू शकतं, ते सर्व अजित पवारांनाच माहीत आहे.”

हेही वाचा- “शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका; म्हणाले, “आता सत्तेत…”

यावेळी बावनकुळेंनी शरद पवारांवरही टीकास्र सोडलं आहे. अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

Story img Loader