Raosaheb Danve : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांचे दौरे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरु असून मॅरेथॉन बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. या बैठकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली. तसेच भाजपाचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच विधानसभेसाठी भाजपाचा प्लॅन काय असेल? या संदर्भातही सूचक विधान त्यांनी केलं.
हेही वाचा : नवी मुंबईतील सिडकोचा भूखंड मंत्री संजय राठोड यांच्या संस्थेच्या घशात; खासगी सचिवाच्या पत्रावर निर्णय
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी दिली आहे. आता निवडणुकीसाठी भाजपाचे राज्याचे संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब दानवे पाहणार आहेत. आमच्या कोअर कमिटीच्या सदस्यांकडेही वेगवेगळ्या समितीची जबाबदारी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील? यासाठी आम्ही योजना तयार केली आहे”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितली.
हर्षवर्धन पाटलांबाबत बावनकुळे काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “हर्षवर्धन पाटील हे आमचे नेते आहेत. समरजितसिंह घाटगे हे देखील आमचे नेते होते. समरजितसिंह घाटगे हे देखील आमचे नेते होते. मात्र, ज्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी स्कोप नाही. ज्या जागा महायुतीला गेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढवायची आहे. आता ज्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याचा विचार केला त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आता अशा पद्धतीचा पेच जास्त ठिकाणी नाही. एक ते दोन ठिकाणी आहे. मात्र,पक्षातून कोणीही बाहेर पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ”, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.