Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : राज्याच्या विविध भागात प्रथेप्रमाणे होळी उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. आज (१४ मार्च) रोजी धूलिवंदन देखील उत्साहात साजरे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बुरा न मानो होली है!’, असं म्हणत होळीचं सेलिब्रेशन केलं जातं. आता होळीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील नेते एकमेकांना शुभेच्छा देतानाही पाहायला मिळत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना खोचक शब्दांत टीका देखील केली आहे. “उद्धव ठाकरेंनी दररोज सभागृहात यावं तर संजय राऊतांनी त्यांचा सकाळचा शिमगा वर्षभरासाठी बंद करावा”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरखळी लगावली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“नाना पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त सरकार चालण्यासाठी होळीच्या निमित्ताने नाना पटोलेंनी संकल्प करावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा”, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील चांगले प्रश्न मांडले पाहिजेत. आम्ही जो काही संकल्पनामा दिला, तो संकल्पनामा पुढे नेण्यासाठी आम्हाला विजय वडेट्टीवारांनी आम्हाला सातत्याने आठवण करून दिली पाहिजे. तसेच त्यांचा काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे. तसेच काँग्रेसमध्ये जे काही मनभेद आणि मदभेत आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न देखील वडेट्टीवारांनी केला पाहिजे, याच त्यांना शुभेच्छा”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

“संजय राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत की ते दररोज सकाळी ९ वाजता जे खोचक टोले लगावतात. त्यांचा तो दररोजचा शिमगा त्यांनी वर्षभरासाठी बंद करावा आणि महाराष्ट्रातील सरकारला विकासासाठी सूचना द्याव्यात. दररोज सकाळी बोलावं पण राज्य कशाप्रकारे पुढे जाईल यासाठी बोलावं”, असा खोचक सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

“उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की त्यांनी दररोज सभागृहात यावं. सभागृहात येऊन राज्य सरकारला चांगल्या गोष्टी सांगाव्यात. कारण उद्धव ठाकरे हे फक्त कधीतरीच सभागृहात येतात”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे.