Chandrashekhar Bawankule : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्रिपदाचं वाटपही झालं. आता सरकार स्थापन होऊन कामकाजही सुरुळीत झालं आहे.
या अनुषंगानेच आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच २०१९ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींवरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत तेव्हा मोठी गद्दारी झाल्याचा उल्लेख करत विरोधकांवर जोरदार घणाघात केला.
हेही वाचा : सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“भारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील एका मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, मी पुन्हा येईन. पण त्यांच्या त्या वाक्याची काहींनी खिल्ली उडवली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी न भूतो, न भविष्यती असं काम केलं. त्यामुळे त्यांना पुन्हा येण्याचा विश्वास होता. पण २०१९ मध्ये प्रचंड मोठी गद्दारी झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. तेव्हा त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका व्हायची त्याचं मलाही वाईट वाटायचं. कोरोनाच्या काळात तेव्हाचे मुख्यमंत्री घरी बसले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे काम करायचे. ते दिवस या महाराष्ट्राच्या सेवेचे आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तुमच्याबाबत एक सहानुभूती आणि चांगली भावना निर्माण झाली”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं, तर उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.
२०१९ मध्ये काय घडलं होतं?
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळालं होतं. पण, मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने शिवसेना (ठाकरे) बाहेर पडली आणि काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जात महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते, तर भाजपाकडे आमदारांचं संख्याबळ जास्त असूनही विरोधी बाकावर बसावं लागलं होतं.