मंगळवारी (१३ जून) देशातील प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असा दावा करण्यात आला होता. तसेच संबंधित जाहिरातीत “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” असा संदेशही देण्यात आला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर संबंधित जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, असं स्पष्टीकरण शिंदे गटाकडून दिलं. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काल वृत्तपत्रात जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये कुणीतरी खोडसाळपणा केला होता. आज शिंदे गटाने चांगल्या भावनेनं जाहिरात देऊन चूक दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न केला,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “अज्ञाताने जाहिरात दिली, शिवसेनेचा काहीही संबंध नाही”, शंभूराज देसाईंचा यू-टर्न
मंगळवारी (१३ जून) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “काल (१३ जून) वृत्तपत्रात जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये कुणीतरी खोडसाळपणा केला होता. शिंदे गटाची भावना वाईट असती तर त्यांनी आजची सुधारीत जाहिरात दिली नसती. मला वाटतंय की कुणीतरी खोडसाळपणा केला होता. तो खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न केला. हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. हे आमच्या युतीसाठी, पक्षासाठीही चांगलं आहे.”
हेही वाचा- “इतके लोकप्रिय आहात तर मग…”, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी!
“युतीमध्ये कुणीतरी लहान व्हावं, कुणीतरी मोठं व्हावं. मला वाटतं की, जेव्हा आपण युती करतो, तेव्हा एखादी चूक आमच्याकडून झाली असेल तर ती चूक आम्ही दुरुस्त केली पाहिजे. त्यांच्याकडून (शिंदे गट) चूक झाली तर त्यांनी दुरुस्त केली पाहिजे. आता यामध्ये बोलण्यासारखं काही नाही. हा विषय आता संपला आहे.” अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.