Chandrashekhar Bawankule On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काल रात्री भेट घेतल्याची माहिती समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. मात्र, आपण चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचं जयंत पाटील यांनीच स्पष्ट केलं. मात्र, जयंत पाटील यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची भेट का घेतली? यावरून अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान, या भेटीबाबत आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच ही भेट राजकीय नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असून त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“जयंत पाटील हे मला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या भेटीवेळी मंत्री विखे पाटील देखील माझ्याबरोबर होते. जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील आणि त्यांच्या मतदारसंघातील विकासकांमाच्या संदर्भात माझ्याबरोबर चर्चा केली. त्यांनी १४ ते १५ निवेदनंही मला दिली आहेत. महसूल खात्याच्या विभागाने काही बैठका घ्याव्या लागतील असे काही विषय होते. त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले आहेत. मी देखील त्यांना आश्वासन दिलं आहे की, येणाऱ्या अधिवेशनात सांगलीची आणि त्यांनी मांडलेल्या १४ समस्यांची बैठक मी माझ्या दालनात घेईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील हे माझी अधिकृत वेळ घेऊन भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे आमची कोणतीही राजकीय भेट नव्हती. तसेच आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा देखील झाली नाही. फक्त विकासाच्या कामाच्याबाबतीत आमची चर्चा झाली. त्यांचे काही मुद्दे महत्वाचे होते ते मी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जयंत पाटील यांनीही माझ्याशी राजकीय चर्चा केली नाही आणि मी देखील त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याएवढं मोठा नाही”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीबाबत जयंत पाटील यांनी सांगितलं की, “सोमवारी संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसूल विभागाच्या प्रश्नांवर मी त्यांना काही निवेदनं दिली आहेत. ती निवदेनं देण्यासाठीच मी भेट घेतली. महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाइन केल्या आहेत त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. आमच्या जिल्ह्यातील बरेच प्रश्न होते. मला ६ वाजण्याची वेळ दिली गेली होती. आमच्यात २५ मिनिटं चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटीलही होते. आमची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी इतर चर्चा कुठलीही केलेली नाही. सुमारे १३ ते १४ निवेदनं दिली आहेत. मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन त्यांना भेटलो”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.