गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील विविध नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जात आहे. याबाबतचे बॅनर्स कार्यकर्त्याकडून लावले जात आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, यासाठी ठाकरे गटाने विठूरायाकडे साकडं घातलं आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या दावेदारीवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खिल्ली उडवली आहे.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे एकूण १० जण दावेदार आहेत. २०२४ पर्यंत यामध्ये आणखी दोन नेत्यांचा समावेश होईल, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी खिल्ली उडवली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- VIDEO: “देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येही नाही, इथले मुस्लीम…”, फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, यासाठी ठाकरे गटाने पांडूरंगाकडे साकडं घातलं आहे, याबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “काही लोक मुख्यमंत्री होण्यासाठी विठूरायाकडे जात असतात. महाविकास आघाडीमध्ये दहाजण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे तीन नेते भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात. यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री म्हणून फोटो लावतात. इकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून फोटो लावतात.”
हेही वाचा- “…तोपर्यंत बाकी लोक पसार झाले”, गुलाबराव पाटलांनी सांगितला बंडखोरीदरम्यान घडलेला किस्सा
“महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे एकूण दहा दावेदार आहेत. २०२४ पर्यंत आणखी दोन नेत्यांचा या यादीत समावेश होईल. दहा मुख्यमंत्री असलेली ही पार्टी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्यासाठी कोण-कोण विठूरायाकडे गेलं होतं, हे मला माहीत नाही. पण आम्ही महाराष्ट्राला समृद्धी येऊ दे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारला एवढं बळ मिळू दे की, ते महाराष्ट्राला पहिल्या क्रमाकांवर आणतील,” असंही बावनकुळे म्हणाले.