Chandrashekhar Bawankule on opposition allegations over EVM Hack : सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, ईव्हीएम हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा विरोधी पक्षांनी आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील तशी तयारी करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. शिवसेनेने (ठाकरे) देखील यावर विचार सुरू केला आहे. ईव्हीएमविरोधात मोठं आंदोलन उभारण्याच्या हालचाली शिवसेनेत (ठाकरे) चालू आहेत. दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या या आरोपांवर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक तुम्ही (काँग्रेस) जिंकलात, तिथे ईव्हीएम चांगले होते का? लोकसभेतही तुम्ही मोठं यश मिळवलं तेव्हा ईव्हीएम चांगले होते का?
चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना म्हणाले, “नांदेडची पोटनिवडणूक तुम्ही जिंकलात, आम्ही तिथे हरलो. जर ईव्हीएम हॅक करून मतं घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभेतही तशी मतं घेतली नसती का? खरंतर हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावं. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं होतं. त्या पराभवातून आम्ही शिकलो. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जे अपयश आलं, त्यानंतर आम्ही काही नव्या गोष्टी शिकलो. त्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं. पुढे काय करायचं ते ठरलं. रणनीती ठरली. आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन काम केलं. मतदान केंद्रांवर जाऊन जनतेला भेटलो. त्यानंतर मतदानाचं प्रमाण देखील वाढलं.
हे ही वाचा >> मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हणून शिंदे गटाने अजित पवारांना धरलं जबाबदार; रामदास कदम म्हणाले, “त्यांनी आमची…”
विरोधकांना झोप लागलेली नाही : बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केलं. मतदान केंद्रांवर मतदानाचे प्रमाण वाढलेलं दिसलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडला. परंतु, विरोधक जे काही बोलत आहेत तो त्यांचा खोटारडेपणा आहे. मला असं वाटतं दोन-चार दिवस त्यांना झोप लागणार नाही. जेव्हा त्यांची झोप लागेल, त्यानंतर त्यांचे डोक शांत राहील.