भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. पडळकरांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते छोट्या नेत्यांना पुढं करतात आणि मोठे नेते फक्त तमाशा बघतात, अशी टीका रोहित पवारांनी केली. या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना इशारा दिला आहे.
रोहित पवारांनी भाजपाबद्दल बोलताना विचार करून बोलावं, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “रोहित पवारांनी भाजपाबद्दल बोलताना जरा विचार करून बोललं पाहिजे. आपल्या पक्षाचे संस्कार आणि संस्कृती बघितली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदाराच्या पोटातून आमदार आणि खासदाराच्या पोटातून खासदार तयार होतात, असा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शरद पवारांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना कधीही मोठं होऊ दिलं नाही. त्यांनी काही लोकांना मोठं केलं, पण त्यांना त्यांच्यापेक्षा मोठं होऊ दिलं नाही,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “गोपीचंद पडळकर हा बालिश आणि…”, ‘त्या’ विधानावरून अजित पवार गट आक्रमक
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर रोहित पवार पवार म्हणाले, “भाजपाचे मोठे नेते मुद्दामहून अशा छोट्या नेत्यांना पुढं करतात आणि विशिष्ट नेत्यांविरोधात बोलायला लावतात. गोपीचंद पडळकर हे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बोलले, ते आम्ही समजू शकतो. कारण आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. पण अजित पवार त्यांच्याबरोबर गेले आहेत. तरीही ते त्यांच्याबद्दल बोलतात, म्हणजे वरिष्ठ नेते सांगतात की अजित पवारांचं महत्त्व कमी करा. आम्ही भाजपाला चांगलं ओळखतो. ते लोकनेत्यांना संपवायचं काम करतात.”
हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक
“अजितदादा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांना आम्ही हेच सांगत होतो की, भाजपाबरोबर जाऊ नका. हे लोक आपला लोकांमधील आदरयुक्त वचक कमी करण्याचा प्रयत्न करतात. छोट्या नेत्यांना पुढं करायचं आणि मोठे नेते फक्त तमाशा बघतात, ही भाजपाची प्रवृत्ती आहे. ही बाब तिकडे गेलेल्या नेत्यांना (अजित पवार गट) कळावी, हेच आमचं मत आहे,” असंही रोहित पवार म्हणाले.