Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका होत आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात भाष्य करत हल्लाबोल केला आहे.
तसेच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा खोचक सल्ला दिला आहे. ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहावं आणि सांगावं की इंडिया आघाडीत राहू इच्छित नाही’, असं खुलं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
कर्नाटक सरकारच्या भूमिकेविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे. कारण कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विधानसभेच्या सभागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा अपमान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहावं आणि सांगावं की आम्ही इंडिया आघाडीत राहू इच्छित नाही. मात्र, उद्धव ठाकरे असं करणार नाहीत”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
बावनकुळे यांनी पुढं म्हटलं की, “उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत जे विचार होते ते विचार उद्धव ठाकरे यांनी बाजूला केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मनाला विचारलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
‘कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल’
कर्नाटक सरकारने विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही हल्लाबोल केला. मुनगंटीवार यांनी म्हटलं की, “खरंच हे खूप गंभीर आहे, कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल. ज्यांनी-ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. ते-ते एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे. मी हे विश्वासाने सांगतोय आज लेहून घ्या. पुढच्या निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव होईल. कारण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे”, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.