शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला जात आहे. पण आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे २०१९ चे महागद्दार आहेत, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात बोलताना बावनकुळेंनी ही टीका केली.
“२०१९ चा महागद्दार म्हणजे उद्धव ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणातला करंटा आणि महाकलंक व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे… अशा व्यक्तीला धडा शिकवणारा महानायक म्हणजे देवेंद्र फडणवीस,” अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
खरं तर, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा केला होता. याच ‘कलंक’ शब्दावरून केलेल्या टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘महाकलंक’ असा केला आहे.
हेही वाचा- “कुणाशी युती नको, कुणाशी भानगडी नको”, कोकणात राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा…
“भाजपा विधानसभेच्या १५२ हून अधिक जागा जिंकेल”
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेचा विजयी संकल्पही बोलून दाखवला. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. तर विधानसभेत महायुतीला २०० हून अधिक जागांवर विजय मिळवायचा आहे. यातील १५२ हून अधिक जागा भाजपा जिंकेल, असा संकल्प केल्याची माहिती बावनकुळेंनी यावेळी दिली.