Chandrashekhar Bawankule on Mahayuti Government & Next Maharashtra Chief Minister : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळालं असलं तरी महायुतीला अद्याप मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेता आलेला नाही. महायुतीने अद्याप सरकार स्थापन केलेलं नाही. आधीच्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून सध्या ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. मात्र राज्यातील जनतेला प्रश्न पडला आहे की महायुतीचे नेते राज्यात सरकार कधी स्थापन करणार? महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? सरकार स्थापनेसाठी महायुतीला इतका वेळ का लागतोय? असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी नव्या सरकारविषयी लोकांना पडलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.

महायुतीला महाराष्ट्रात बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. तरी देखील महायुतीला अद्याप मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेता आलेला नाही. मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचं केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात निरीक्षक पाठवणार असल्याची चर्चा आहे. कदाचित भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील महायुतीचा नेता निवडतील. यासाठी २९ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्हाला अद्याप तरी तसा काही निरोप आलेला नाही”. तसेच यावेळी त्यांना विचारण्यात आलं की युतीचं सरकार स्थापन करायला, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यायला महायुतीला इतका वेळ का लागतोय? त्यावर बावनकुळे म्हणाले, “ही युती आहे. यात अनेक पक्ष आहेत. अनेक निर्णय घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागणारच”.

हे ही वाचा >> “लोकसभेतील पराभवानंतर आम्ही…”, ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपांवर भाजपा नेतृत्त्वाची पहिली प्रतिक्रिया

बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “युतीचं सरकार बनवण्यासाठी थोडाफार वेळ लागतो. शिवसेनेला कोणतं मंत्रीपद द्यायचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) कोणतं मंत्रीपद द्यायचं? कॅबिनेटचा फॉर्म्युला काय असेल? कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं द्यायची? पक्षांचा व महायुतीचा पोर्टफोलिओ कसा असेल? कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोणत्या नेत्यांची निवड करायची? असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात. केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी करून भागत नाही. यासाठीचं सूत्र ठरवावं लागतं आणि मी मघाशी सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करून मग सरकार बनवावं लागतं”.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कुणाकडे किती आमदार आहेत? कोणाला कोणतं खातं हवं आहे? या सगळ्याचा सारासार विचार करून सरकार स्थापन करावं लागतं. मला वाटतं त्यासाठी वेळ जाईल. परंतु लवकरच महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल. सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचं मत घ्यावं लागेल. तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांची मतं घ्यावी लागतील. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार बनवावे लागेल. मात्र, मी ठामपणे सांगतो की जेव्हा सरकार बनेल तेव्हा पूर्ण क्षमतेने सरकार उभं असलेलं तुम्हाला दिसेल. सरकार बनवताना सर्व पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. आमच्या घटक पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. सगळ्यांचा विचार केला जाईल, त्यानंतर सरकार बनेल.