राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच औरंगजेबाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. छत्रपती संभाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी औरंगजेबाने डोळे काढले होते. त्याठिकाणी भगवान विष्णूचं मंदिरही होतं. ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं असतं’ असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं. आव्हाडांच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
ही घटना ताजी असताना आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख केला आहे. आव्हाडांवर टीकास्त्र सोडना बावनकुळेंनी हे विधान केलं आहे. बावनकुळेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल
आव्हाडांच्या विधानाचा निषेध करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे… त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत, अशा आशयाचं विधान बावनकुळेंनी हिंदी भाषेतून केलं आहे. त्यांनी औरंगजेबचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “क्रूरकर्मा औरंग्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी ‘औरंगजेबजी’ असे सन्मानाने म्हणतात, त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषत: टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?” असा सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.