शिवसेनेच्या शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर एक मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात शिंदे गटाने एक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत. या जाहिरातीतल्या मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे, तर देवेंद्र फडणवीसांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर बसलेलं पाहायचं आहे.
शिंदे गटाने ही जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कल्याण लोकसभेवरून दोन्ही पक्षांमध्ये वातावरण तापलं आहे. तसेच शिंदे गटातील काही मंत्र्यांना भाजपाचा विरोध असल्याने राज्य सरकारचा मंत्रिमडळ विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे. अशातच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याची चर्चा आहे. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी जाहिरात केली होती. परंतु शिंदे गटाने राष्ट्रामध्ये ‘मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली जाहिरात प्रसिद्ध करून एकनाथ शिंदे अधिक लोकप्रिय असल्याचा केला आहे.
दरम्यान, याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात नरेंद्र ही घोषणा मागे पडलीय का? तसेच नरेंद्र-देवेंद्र ऐवजी मोदी-शिंदे हे बदलेलं समीकरण आवडलं का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांना विचारला. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहे. या सरकारचे प्रमुख आहेत. तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाने जाहिरातीत तसं लिहिलं असावं.
हे ही वाचा >> “एकनाथ शिंदेंची मोठी झेप, देवेंद्र फडणवीसांना…”, शिंदे गटाच्या जाहिरातीचं छगन भुजबळांना आश्चर्य; म्हणाले…
बावनकुळे म्हणाले, या राज्यातल्या जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगलं काम केलं होतं. मुळात कोण मोठं, कोण लहान हे शिवसेना भाजपात महत्त्वाचं नाही.