Chandrashekhar Bawankule on Sudhir Mungantiwar Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून मंत्रीपद न मिळालेले नेते संतप्त झाले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा प्रसारमाध्यमांसमोरच त्यांची नाराजी प्रकट केली. “ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रीपद मिळते. मला मंत्रीपद मिळणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला आश्वासन दिलं होतं, तरी मला मंत्रिपद मिळालं नाही, पण मी नाराज नाही”, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. तर, “मराठा समाजाचे नेते मनोज जरागे यांच्याशी संघर्ष केल्याचे बक्षीस मिळाले”, अशी खंत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपूर अधिवेशन सोडून नाशिकला रवाना झाले. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार व छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणतीही नाराजीची गोष्ट नाही. काही काळापुरतं थांबावं लागतं”, असं बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच “भुजबळ व मुनगंटीवार हे आपापल्या पक्षांचे निर्णय समजून घेतील”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “खरंतर ही काही नाराजीची गोष्ट नाही. नेत्यांना काही काळापुरतं थांबावं लागतं. मग पुढे जावं लागतं. पुन्हा थांबावं लागतं, पुन्हा पुढे जावं लागतं. मला वाटतं छगन भुजबळ ही गोष्ट समजून घेतील. सुधीर मुनगंटीवार यांनी ही गोष्ट समजून घेतली आहे. कारण शेवटी पक्षांतर्गत निर्णय होत असतात. ते निर्णय मान्य करून आपल्याला पुढे जावं लागतं. हे दोन्ही नेते समजून घेऊन पुढे जात राहतील, असं मला वाटतं”.

नाराजीचा ‘विस्तार’

रविवारी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांची नाराजी उघड केली. मुनगंटीवार व भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या कृतीतून त्यांची नाराजी प्रकट केली आहे. शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते तानाजी सावंत नागपूरमधील हिवाळी अधिवेशून अर्ध्यात सोडून ते पुण्याला रवाना झाले. आता दिले तरी मंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे (शिंदे) नेते विजय शिवतारे यानी व्यक्त केली. ज्येष्ठ भाजपा नेते संजय कुटे यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्याबाबत काही वेगळा विचार केल्याने त्यांना मंत्रीपद दिले नसल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न पत्रकारांशी बोलताना केला.

Story img Loader