Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : आज मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यापुढे राजकारणात एक तर तू राहशील, नाहीतर मी राहील, असं म्हणत त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेअर बावनकुळे यांनीही या विधानावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांच्या जीवावर उद्धव ठाकरे हे फडणवीसांना आव्हान देत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेअर बावनकुळे?
उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या भरोशावर देवेंद्र फडणवीस यांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ही भाषा ऐकली असती, तर त्यांना काय वाटलं असतं याचा विचार आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवा. खरं तर ते काय बोलत आहेत, त्यांचं त्यांनाही कळत नाही. त्यांच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. त्यांच्याच भरोशावर उद्धव ठाकरे फडणवीसांना आव्हान देत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – Uddhav Thackeray : “एक तर तू तरी राहशील किंवा मी…”, उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान; नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दिसून येते. उद्धव ठाकरे आता जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. राज्यातील जनताच त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करेल, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आता खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत. जर-तरची, तसेच बघून घेण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे जनता त्यांना मतांच्या रुपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे चिथावणीची भाषा त्यांना शोभत नाही. महाराष्ट्र हे संस्कृती जपणारे राज्य आहे. मात्र, त्यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिले आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहे का? भारतीय जनता पक्ष आरेला कारे करणारा पक्ष आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – “त्या गद्दारीचे सरदार कोण होते? हे देखील…”, सुनील तटकरेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. “मला आणि आदित्यला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे आता राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी त्यांना आव्हान देत आहे.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.