ठाण्यात शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘फडतूस’ गृहमंत्री असा केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर भाजपा आणि शिंदे गटाकडून टीकास्र सोडले जात होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढे फडणवीसांबद्दल काही बोललात, तर ‘मातोश्री’बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीसांवर झालेले संस्कार आडवे येत आहेत. नाहीतर त्यांनाही उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देता आले असते. उद्धव ठाकरे हे एक नंबरचे विश्वासघातकी आहेत. व्यक्तीगत टीका कधीच सहन करणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. जर अशीच टीका सुरू ठेवली, तर तुमचे ‘मातोश्री’बाहेर पडणे मुश्कील होईल. फडणवीसांबद्दल विधान करताना सांभाळून बोला. त्यांच्या ताकदीशी बरोबरी तुम्ही कधीच करू शकणार नाही,” असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : “संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुंड आणि चोर, त्यांनी…”, शहाजीबापू पाटलांचं विधान!

भास्कर जाधवांनी बावनकुळेंची वेस्ट इंडिजच्या खेळाडूबरोबर केली तुलना

यावर आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य करत बावनकुळेंचा समाचार घेतला आहे. “चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. बावनकुळे पॅट्रिक पॅटरनसारखे दिसतात का तर नाही. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग, ते कोणासारखे दिसतात, तर वेस्ट इंडिजचे खेळाडू अ‍ॅब्रोससारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, अ‍ॅब्रोस कसे दिसत होते”, अशी खिल्ली भास्कर जाधवांनी बावनकुळेंची उडवली आहे.

“तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही,” असा इशाराही भास्कर जाधवांनी बावनकुळेंना दिला आहे.

हेही वाचा : “अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!

भास्कर जाधवांनी वेस्ट इंडिजच्या खेळाडूबरोबर तुलना केल्यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्यावर व्यक्तीगत टीका करून त्यांना आनंद मिळत असेल. मग, त्यांनी आनंद घ्यावा,” अशी मोजक्या शब्दांत बावनकुळेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule reply bhaskar jadhav over compare with west indies player curtly ambrose ssa