मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर भाजपाने केलेल्या टीकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी ( १६ ऑगस्ट ) समाचार घेतला. ‘टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपाने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधायला शिकावं,’ अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“१९८४ साली भाजपाकडे २ खासदार होते. आज लोकसभेत भाजपाचे ३०३ खासदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिलं जातं. मागील २० वर्षात कोणत्याही पक्षाला एवढे बहुमत मिळाले नाही. पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो. समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण करण्यासाठी कामे करावी लागतात. पक्ष वाढवण्यासाठी आयुष्यातील १८-१८ तास द्यावे लागतात. संवाद, प्रवास आणि सर्वधर्मियांमध्ये एक जागा निर्माण करावी लागते. हे केलं तर पक्षात लोक येतात.”
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता…”, जयंत पाटलांचं विधान
“आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही”
“आम्ही कोणाकडे जाऊन जबरदस्तीने पक्षात लोक आणत नाही. भाजपा जगात आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष हे. अशावेळी कोणी पक्षात आलं आणि येण्याची इच्छा व्यक्त केली. तर, भाजपाचा शेला ( दुपट्टा ) गळ्यात घालण्यासाठी तयार आहे. विश्वासार्हता निर्माण करून भाजपाचा प्रवास झाला आहे, याचं राज ठाकरेंना कौतुक केलं पाहिजे. आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. आमच्याशीच देशात आणि राज्यात गद्दारी कित्येकवेळा करण्यात आली आहे,” असं बावनकुळेंनी सांगितलं.
हेही वाचा : “आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत”, भरत गोगावलेंच्या विधानावर बच्चू कडू म्हणाले…
“…तर, राज ठाकरे पुढे बोलणार नाहीत”
“जनतेचा विश्वास आमच्यावर वाढत आहे. त्यामुळे पक्षही वाढत आहे. आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही. जनतेत भाजपाचा असलेला प्रवास, संवाद आणि विश्वास राज ठाकरेंनी समजून घ्यावा. तर, राज ठाकरे पुढे बोलणार नाहीत,” असेही बावनकुळेंनी म्हटलं.