राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदाणी समूहाविषयी मांडलेल्या भूमिकेवरून देशात आणि राज्यात गदारोळ सुरू आहे. आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचे कधी नावही ऐकले नव्हते. त्या कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावरून मनसे आणि भाजपात जुंपली आहे.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी भाजपाची बी टीम आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. “भाजपाची भूमिका राष्ट्रवादी मांडत आहे. तर, राष्ट्रवादी भाजपाची बी टीम आहे का? तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करता, मग स्वत: बी टीम आहात का? भाजपाने लिहिलेली स्क्रिप्ट शरद पवार वाचून दाखवत आहेत का?,” असे प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले.
यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं, “विदेशात पंतप्रधान मोदींना ७८ टक्के पसंती मिळाली आहे. भारत जगात ५ व्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे विदेशी ताकद आणि उद्योजक भारताला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहेत.”
“कुठे चूक झाली असेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी होऊद्या. शरद पवार यांचेही तेच मत आहे. पण, शरद पवारांचे राजकारण १०० टक्के भाजपाविरोधी आहे. त्यांना कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही,” असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी देशपांडेंना दिले आहे.
हेही वाचा : शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले…
“सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त”
“अदानी उद्योग समूहाच्या कथित गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीपेक्षा ( जेपीसी ) सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल,” असे शरद पवार यांनी म्हटले.