कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊतांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. सध्या आर्थर रोड जेलमधील कारागृहात संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. त्यात संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी कोर्टाच्या बाकड्यावर हे पत्र लिहीत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
त्या पत्रात अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस जबाब नोंदवून घेतले आहेत, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी ईडीविरोधात केला आहे. या आरोपांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“मागील तीन वर्षापासून संजय राऊत केंद्र सरकारवर टीका करत होते. आता कारागृहात असून सुद्धा ते आरोपच करत आहेत. केंद्रीय यंत्रणांवर दबाव टाकून आपले पाप लपवण्यासाठी संजय राऊत. असं बोलत आहेत. कोणतीही केंद्रीय यंत्रणा बंदुकीच्या धाकावर चौकशी करत नाही,” असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
हेही वाचा – ईडीचे अधिकारी घरात घुसले तेव्हा नेमकं काय घडलं? संजय राऊतांनीच सांगितला घटनाक्रम
संजय राऊत पत्रात काय म्हणाले?
“ईडी, प्राप्तिकर विभागाच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही. कोणीतरी खंबीरपणे उभं राहायला हवं. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत तू आणि बाळासाहेबांनीच मला दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस जबाब नोंदवून घेतले आहेत,” असं संजय राऊतांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.