भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षांना वापरते आणि योग्य वेळी त्यांना संपवून टाकते, असा आरोप भाजपाच्या अनेक मित्रपक्षांनी यापूर्वी केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनीदेखील असा आरोप यापूर्वी केला आहे. अशातच भाजपाच्या आणखी दोन मित्रपक्षांनी भाजपावर आरोप केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले, भाजपा लहान पक्षांचा वापर करते, त्यानंतर त्यांना फेकून देते. त्यांच्याकडे मोठी माणसं आली की त्यांना छोट्या माणसांची काही गरज नसते. भाजपा आणि काँग्रेसची अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची हीच पद्धत आहे. जानकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले, जानकर जे काही बोलत आहेत तसा अनुभव मलाही येऊ लागला आहे. एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि नंतर ठेचून काढायचं असं राजकारण आहे. हे चालतंय तोवर असंच चालत राहणार आहे.”
दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू आणि महादेव जानकरांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले, बच्चू कडू आणि महादेव जानकर या दोन्ही नेत्यांचा भाजपाने नेहमीच सन्मान केला आहे. मी बच्चू कडू यांना सांगेन की, तुम्हाला महाविकास आघाडीत जेवढा मान-सन्मान नव्हता त्यापेक्षा जास्त सन्मान महायुतीच्या सरकारने दिला आहे. मला अभिमान आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्ही जी कामं घेऊन गेलात ते प्रत्येक काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कारण तुम्ही आमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तुमच्यासह प्रत्येक लोकप्रतिनिधीची सर्व कामं करणं ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्हाला आम्ही चांगलं सांभाळलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे महादेव जानकर यांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला माझी विनंती आहे की भाजपावर टीका करण्यापेक्षा, आमच्यावर टीका करण्यापेक्षा एकत्र काम करू. तुम्हीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होता. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा प्रत्येक वेळी छोट्या पक्षांना पूर्ण ताकदीने सांभाळण्याचं काम आम्ही केलं आहे. सदाभाऊ खोतांनाही विचारा. खरंतर काहीजण निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत की एनडीएत छोट्या पक्षांना काही मिळत नाही. परंतु, आमच्याकडे तशी स्थिती नाही.
हे ही वाचा >> “जगाच्या इतिहासात असं जागावाटप झालं नाही”, प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ मागणीवर संजय राऊतांची नाराजी
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, तुम्ही भाजपाचा इतिहास पाहा. अटल बिहारी वाजपेयींपासूनचा इतिहास तपासून पाहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास पाहा. आम्ही जेव्हा जेव्हा सत्तेत आलो तेव्हा तेव्हा लहान पक्षांना खूप मोठं स्थान दिलं आहे. एनडीए आणि सरकारमध्ये त्यांना सांभाळलं आहे. आम्ही लहान पक्षांना धाकट्या भावाप्रमाणे सांभाळतो. कधीही लहान पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करत नाही.