मुंबईत रविवारी ( ६ जुलै ) रंगशारदा सभागृहात शिवसेना ( ठाकरे गट ) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस आता ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आला, याची नोंद ठेवणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“सरकारमध्ये किती उपमुख्यमंत्री नेमणार आहात? म्हणजे आधी एक पक्ष चोरला, नंतर दुसरा पक्ष चोरला. आता कुणीतर सांगत होतं, काँग्रेसही फोडणार आहेत. त्यामुळे राज्यात किती उपमुख्यमंत्री होणार आहेत? आणि देवेंद्र फडणवीस फक्त ‘मस्टर मंत्री’ राहणार की काय? ते फक्त वही घेऊन कोण आला? याची नोंद ठेवणार का?” अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली होती.
हेही वाचा : “२०२४ नंतरही अजितदादा…”, अमित शाहांच्या कौतुकावर संजय राऊतांची टीका; म्हणाले, “सिंचन घोटाळ्याचा नेता”
यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं,” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले”
“ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपामध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय?” असा सवाल चंद्रशेखवर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
“नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही”
“तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं,” असं बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : “जयंत पाटील पळपुटे नाहीत, त्यांचा अन् आमचा…”, अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चेवर संजय राऊतांचं विधान
“…तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
“औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय,” अशी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.