भाजपा आणि शिंदे गटात जाहिरातीवरून तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात असतानाच एका भाजपा नेत्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मोदी@ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत,” असं मौर्य म्हणाले.
केशवप्रसद मौर्य म्हणाले, “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर ते त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडावे. भाजपाचे दरवाजे बंद नाहीत. परंतु उद्धव ठाकरेंना चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजपा स्वतःहून चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण, त्यांनी चूक केली आहे, भाजपाने कोणतीही चूक केली नाही,”
दरम्यान, आता यावर भाजपाने त्यांची अधिकृत भूमिका मांडली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केशव प्रसाद मौर्य यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत आहे. उद्धव ठाकरेंकरता आमचे सारे दरवाजे बंद आहेत. आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही, त्यांच्याशी कधीही, कुठलीही चर्चा करणारच नाही.
हे ही वाचा >> “अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, ते खूप…”, दीपक केसरकरांची खुली ऑफर
यावेळी बावनकुळे म्हणाले, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने जे काही केलं (कर्नाटक सरकारे धर्मांतरविरोधी कायदा रद्द केला आहे, तसेच, अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडाही वगळला आहे.)आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडावी. किमान त्यांच्या मुखपत्रातून त्यांनी याबाबतची भूमिका उद्या छापली पाहिजे. कर्नाटकात काँग्रेस जे काही करतंय त्याबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका महाराष्ट्राला समजली पाहिजे.