Chandrashekhar Bawankule on Maharashtra CM & Devendra Fadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (९ नोव्हेंबर) सांगलीच्या शिराळ्यात जाहीर सभा घेतली. या सभेत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचं आहे, असं वक्तव्य केलं. शाह यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. महायुतीने एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याची चर्चा चालू असतानाच आता शाह यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बानवकुळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याकरिता, जनतेच्या विकासाकरिता महायुतीचं सरकार या राज्यात यावं, डबल इंजिन सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा विकास करावा आणि महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य व्हावं याकरिता प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे भाजपाचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा विजय असतो. आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून यायला हव्यात. महायुती म्हणून भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादीच्या (अजित पवार) अधिकाधिक जागा याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अमित शाह यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढू नका. महायुतीचं सरकार यावं असं अमित शाह म्हणाले आहेत”.
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार हे मुख्यमंत्री बनण्याच्या कुठल्याही चढाओढीमध्ये नाही. १४ कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प घेऊन व सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही काम करतोय. आम्ही विकासाकरिता काम करत आहोत. मुख्यमंत्रिपदासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचे १४ दावेदार आहेत. आम्ही मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी मतं मागत आहोत. मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं केंद्रातील नेतृत्व किंवा राज्यातील नेतृत्व निर्णय घेईल. आम्ही सध्या त्यावर विचार करत नाही”.
ईडीच्या दबावामुळे भुजबळांना भाजपात जावं लागलं? बावनकुळे म्हणाले…
“ईडीच्या दबावामुळे मला भाजपात जावं लागलं”, असं छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आज मी छगन भुजबळांबरोबर होतो. त्यांनी व्यक्तिगत मला असं सांगितलं की मी असं कुठेही बोललो नाही. त्यांनी मला व्यक्तिगत सांगितलं की ते सर्व काही खोटं आहे. मी कुठेही असं बोललो नाही, माझा कुठेही आसा गैरवापर करणे योग्य नाही, भुजबळ हे कायदेशीर कारवाई करतील असं दिसत आहे”.