रामजन्मभूमी आंदोलन आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य हे व्यक्तिगत आहे. ती पक्षाची भूमिका नाही, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले की, रामजन्मभूमीसंदर्भात आंदोलन सुरू होतं तेव्हा त्यात सर्व सहभागी कारसेवकांची प्रभू रामचंद्रांचे मंदिर व्हायला हवे अशी भूमिका होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यकर्त्यांचाही हाच विचार होता. अयोध्येत राम मंदिर व्हावं, अशीच शिवसैनिकांची इच्छा होती. त्यामुळे बाबरी मशिदीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य त्यांचे व्यक्तिगत असून, ती पक्षाची भूमिका नाही.
बावनकुळे म्हणाले की, त्यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडली आहे. पक्षाची भूमिका मी सांगितली आहे. त्यावेळी (बाबरी पाडली तेव्हा) वेगवेगळ्या पक्षांचे नेते-कार्यकर्ते एकत्र आले होते. त्या सर्वांचा एकच विचार होता, तो म्हणजे तिथे राम मंदिर व्हावं. या संपूर्ण आंदोलनात बाळासाहेबांचा मोठा सहभाग होता.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील काल एका मुलाखतीत म्हणाले की, “त्यावेळी मशीद पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते का? शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते”
हे ही वाचा >> “उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी…”; बाळासाहेबांवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाच्या या दोन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषदा घेऊन पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, सर्व स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.