Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (२ एप्रिल) संसदेत मांडण्यात आलं. रात्री उशिरा यावर मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मतं पडली. तर, विरोधात २३२ मतं पडली. हे विधेयक मंजूर होऊ नये यासाठी विरोधकांनी शेवटपर्यंत कडाडून विरोध केला होता. शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी देखील या विधेयकाचा विरोध केला. तसेच त्यांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची हिंदुत्ववादी अशी ओळख आहे. देशभरातील या विचारांचे पक्ष विधेयकाच्या बाजूने असताना उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यामुळे भाजपासह एनडीएतील पक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे त्यांचे कट्टर शिवसैनिक नाराज असून ते लवकरच पक्ष सोडतील, असा दावा राज्याचे महसूल मंत्री व भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. मतांसाठी ते काही लोकांचं लांगुलचालन करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, विशिष्ट समाजाचा विचार करून त्यांच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते, त्यांचे शिवसैनिक शिवसेना सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यासंदर्भात मला काल सकाळपासून फोन येत आहेत. आजही अनेक मेसेज आले आहेत. मला भाजपात पक्ष प्रवेश घ्यायचा आहे अशी विचारणा होत आहे. मंगळवारी काही जण पक्षप्रवेश करू शकतात.
जनता आता उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करणार नाही : बावनकुळे
उद्धव ठाकरे व त्यांच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करून महाराष्ट्राचा व देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही. ज्या लोकांनी त्यांचे खासदार निवडून दिले त्यांना आता वाईट वाटत असेल की आपली चूक झाली, आपण उगाच उद्धव ठाकरे यांच्या मशालीवर मतदान केलं. त्यामुळे जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही. कारण त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे.