राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सभागृहात दोन्ही बाजूंनी आपापली बाजू मांडण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न करताना सत्ताधारी आणि विरोधक दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या बाहेरही दोन्ही बाजूंनी टीका केली जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना अजित पवारांवर टीकास्र सोडलं आहे.
“जयंत पाटलांना विरोधी पक्षनेतेपद का दिलं नाही?”
“जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली, तेव्हा सत्तेची संपूर्ण फळं अजित पवारांनी चाखली आहेत. उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवारच राहिले आहेत. जयंत पाटलांना विरोधी पक्षनेते का नाही केलं? तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून जनतेमध्ये का नाही फिरत? कारण तुम्ही सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे उपभोगलंय. तुम्हाला खाली राहण्याची सवय नाही. तुम्ही जयंत पाटलांना विरोधी पक्षनेतेपद देऊ शकले असते. पण तुम्ही फडणवीसांची बरोबरी करायला निघाला आहात. तुम्ही ते करूच शकत नाहीत”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
“अजित पवार फडणवीसांसमोर एक टक्काही नाहीत”
“अजित पवारांनी आपल्या पक्षातलं बघितलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्पायडर मॅनसारखे काम करत आहेत. त्यांच्या कामाला अजित पवार एक टक्काही नाहीयेत.त्यामुळे अजित पवारांनी तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत”, असंही बावनकुळे म्हणाले.
“..तर शिंदे-फडणवीस सरकारची गरज पडली नसती”
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी अजित पवार हेच होते, असा गंभीर दावा यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. “अजित पवार आणि त्यांच्या टीमकडे २२ वर्षं सरकार होतं. मात्र, प्रत्येक वेळी ७० टक्के अर्थसंकल्प पश्चिम महाराष्ट्रावर खर्च होत होता. पण अजूनही पश्चिम महाराष्ट्रातला ५० टक्के भाग दुष्काळी आहे. हे पाप कुणाचं आहे? विदर्भ-मराठवाड्याबाबत अजित पवार म्हणाले होते की राज्यपालांनी १२ आमदार द्यावेत, त्याशिवाय आम्ही विदर्भ-मराठवाड्याचा विकास करणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावेळी ओबीसी आयोगानं ४३६ कोटी अजित पवारांना मागितले, तेव्हा अजित पवारांनी ते पैसे नाही दिले. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी अजित पवार होते. त्यांनी तेव्हा पैसे दिले असते, तर तेव्हाच ओबीसी आरक्षण मिळालं असतं. देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या सरकारची गरज नसती पडली”, असं बावनकुळे म्हणाले.