इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणावरून भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदींच्या कथित संबंधांवर भाष्य केलं. तसेच या संबंधांवर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्याही दाखवल्या.
राहुल गांधी म्हणाले, “अदाणी यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक बिलियन डॉलर्स इतकी मोठी रक्कम भारतातून वेगवेगळ्या देशात गेली आणि ते पैसे वेगवेगळ्या मार्गाने परत त्यांच्याकडे आले. त्या पैशांचा वापर करून अदाणी यांनी त्यांच्या शेअर्सच्या किंमतीत फेरफार केला. त्यातून त्यांनी मोठी कमाई केली. या कमाईतून आणि चिनी भागीदाराबरोबर मिळून गौतम अदाणी आता देशात विमानतळं, बंदरं, पायाभूत सुविधा आणि देशाची संपत्ती खरेदी करू लागले आहेत. परंतु, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र स्वस्थ बसून आहेत.” दरम्यान, अदाणी प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांनी गौतम अदाणी यांची चौकशी करायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी मांडली.
राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर त्यांना भारतीय जनता पार्टीने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अदाणी कंपनी आज स्थापन झालेली नाही. ही कंपनी आधीपासूनच भारतात आहे. या कंपनीच्या व्यवसायाचा ९० टक्के कार्यकाळ हा काँग्रेस सरकारच्या काळातलाच आहे.
हे ही वाचा >> इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळातच ही कंपनी मोठी झाली आहे. ठीक आहे! त्यांनी जर चौकशीची मागणी केली असेल तर सरकार त्यांचं काम करेल, चौकशी करेल. अदाणी समूह काँग्रेसशासित राज्यात काम करतोय. देशात काँग्रेसचं सरकार होतं, त्या ६५ वर्षांच्या काळातही हा समूह देशात काम करत होता. लोक चौकशीची मागणी करत आहेत तर करू द्या. आमचे मोदीजी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) उद्योगपतींसाठी काम करत नाहीत. ते देशासाठी काम करतात.