महाराष्ट्राच्या विधानभवनाबाहेर आज (२३ मार्च) लोकांच्या भुवया उंचावणारं चित्र पाहायला मिळालं. कारण राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. यावेळी दोघेजण चर्चा करताना दिसले. हे चित्र पाहून अनेकांनी वेगवेगळे राजकीय कायास बांधायला सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल विचारलं असता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे बोलले किंवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले आणि बोलत राहिले तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी चांगली आहे. असं होत राहिलं तर कमीत कमी सकाळी ९ चा भोंगा तरी बंद होईल. रोज सकाळी ९ वाजता जो भोंगा सुरू होतो, बंद होईल.”
खरंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत बऱ्याचदा सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बातचित करतात. त्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा >> “इतक्या तातडीने कारवाई करण्याची गरज काय?” माहीम मजार प्रकरणावरून अबू आझमींचा सरकारला सवाल
“…तर सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद होईल”,
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “उद्धवजी आणि देवेंद्रजी हसत-बोलत गेले तर सकाळचा भोंगा बंद होईल. हेच चालतं आणि हेच झालं पाहिजे. याची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहातोय. सर्वांनी एकमताने काम केलं पाहिजे. विरोधी पक्षांनी विधायक काम करून सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. सरकार त्यावर काम करेल. जसं काल राजसाहेबांनी (मनसे अध्यक्ष राज ठाकरे) माहिम येथील अनधिकृत बांधकामाची माहिती दिली. त्यानंतर आज सरकारने ती चूक दुरुस्त केली.