शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (२३ एप्रिल) जळगावमधल्या पाचोरा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मोदींकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, “ते घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? ते म्हणतात, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं?”
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तरं येऊ लागली आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. खरंतर त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. १५० पेक्षा जास्त देशांनी मोदीजींना पसंती दर्शवली आहे. त्याच मोदीजींचा तुम्ही एकेरी उल्लेख केला. मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील. मोदीजींचं इतकं मोठं वादळ महाराष्ट्रात येणार आहे.
बावनकुळे म्हणाले की, पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या वादळाला हे (उद्धव ठाकरे) घाबरतात म्हणून सतत मोदीजी – मोदीजी करून टाईमपास करत असतात. मोदीजींची उंची काय, तुमची उंची काय याचा विचार कराल का? तुमच्याजवळ दोन जण राहायला तयार नाहीत. मोदीजी जगात मान्यता मिळवतात. भारताला सर्वोत्तम करण्याचा संकल्प करतात आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवता.