गेल्या काही महिन्यांपासून इंडिया आघाडीला मोठी गळती लागली आहे. आघाडीतल्या पक्षांमधील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपात सामील झाले आहेत. तसेच उत्तर भारतात इंडिया आघाडीतले संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकशाही आघाडीसारखे काही पक्षदेखील भाजपाप्रणित एनडीएत सहभागी झाले आहेत. तर महाराष्ट्रात भाजपाप्रणित महायुती महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के देत आहेत. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांनी अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करत आहेत. काहीजण तयारीत आहेत. परंतु, तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकतं. मोदींना साथ देण्यासाठी कोणीही आमच्याकडे येऊ शकतं.

जयंत पाटील यांच्याबाबत उडत असलेल्या अफवेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, जयंत पाटील आणि माझी कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही. किंवा त्यांचं माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही. या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील. तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकतं.

“…तर आमचा दुपट्टा तयार आहे”

भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, मोदींनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोणी भाजपात येणार असेल तर आमचा दुपट्टा त्यांच्यासाठी तयार आहे. आम्ही कोणालाही आमच्या पक्षात घेण्यासाठी तयार आहोत. आमच्याकडे जागा आहे. त्यामुळे आम्ही कोणलाही नाही म्हणणार नाही. आमच्या विचारधारेवर पक्षात जी काम करण्याची पद्धत आहे, त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं. त्यासाठी कोणीही पक्षात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू.

जयंत पाटील यांनी भाजपामधील वरिष्ठांशी संपर्क केला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मला याबद्दल माहिती नाही. परंतु, कुठल्याही नेत्याची विश्वासार्हता धोक्यात येईल असं वक्तव्य मी करणार नाही. जयंत पाटील हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते कोणाच्या संपर्कात आहेत हे मला माहिती नाही. ते माझ्या संपर्कात तरी नाहीत.

हे ही वाचा >> Chandigarh : महापौरांच्या राजीनाम्यापाठोपाठ ‘आप’च्या तीन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश? चंदीगडमध्ये चाललंय काय?

लोकसभा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणाार?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या ताकदीने काँग्रेसची बाजू मांडत आहेत. परंतु, अशोक चव्हाणांप्रमाणे तेही लवकरच भाजपात जातील अशा अफवा पसरल्या आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साध देण्यासाठी जे लोक भाजपात येणार असतील त्यांच्यासाठी भाजपाचा दुपट्टा तयार आहे. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule statemant on rumours jayant patil vijay wadettiwar bjp joining asc
Show comments