लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीमान्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केलं असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी अशाप्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं, असे ते म्हणाले. सोलापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आम्ही त्यांचा मान, सन्मान ठेवण्याचा कायम प्रयत्न केला. त्यात आम्ही कोठेही कमी पडलो नाही. मात्र, पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं. कारण जनता मोदींच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हेही वाचा – धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली!, शरद पवार गटात जाणं जवळपास निश्चित, माढ्यात घडामोडींना वेग
महत्त्वाचे म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर हा शरद पवार यांचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भातही बावनकुळे यांनी भाष्य केलं. हा शरद पवार यांनी टाकलेला हा डाव वगैरे असं काहीही नाही. आमच्याकडेही दररोज हजारोंनी पक्षप्रवेश होत आहेत. शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही. त्यामुळे आमच्याकडील एखादी व्यक्ती तिकडे गेला म्हणजे त्यांनी खूप काही मोठं केलं, असा त्याचा अर्थ होत नाही. निवडणुकीच्या राजकारणात कमी-जास्त होत राहतं, असं ते म्हणाले.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील देखील विधान परिषदेच्या आमदारकीच्या राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, याबाबतीत रणजितसिंह मोहिते पाटील मला काही बोलले नाहीत. रणजितसिंह यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील.