भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्याला पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले की, अनिल देशमुख खोटं बोलत आहेत. त्यांना भाजपाने कोणतीही ऑफर दिली नव्हती. मी जर तोंड उघडलं दिलं तर देशमुखांना उत्तरही देता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बावनकुळे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात जे काही घडलं ते मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील, त्यांचे पाय आणखी खोलात जातील. दरम्यान, माध्यमांचे प्रतिनिधी म्हणाले की, देशमुखांनी दावा केला आहे की, भाजपा नेते त्यांच्या मागे लागले होते. यावर उत्तर देताना बावनकुळे संतापले आणि म्हणाले की, आम्हाला अनिल देशमुखांची काहीच गरज नव्हती. पण अनिल देशमुखांना भाजपाची काय गरज होती ते आम्ही वेळ आल्यावर सांगू.

“न्यायालयाने देशमुखांना क्लीन चीट दिलेली नाही”

बावनकुळे म्हणाले की, माझी अनिल देशमुखांना सूचना आणि विनंती देखील आहे की, ते जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत याचं त्यांनी भान ठेवावं. न्यायालयाने सांगितलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करावं. त्यांना न्यायालयाने क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी टोलेबाजी बंद करावी.

हे ही वाचा >> “शिवसेना फोडण्यात कोण कलाकार होते, एकनाथ शिंदेंनी…” रोहित पवारांचा त्या नेत्याकडे इशारा

देशमुखांच्या दाव्याला पवारांकडून दुजोरा

दरम्यान, अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याआधी भाजपाकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती. या देशमुखांच्या दाव्याला राष्ट्रवाधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला आहे भाजपाकडून अनिल देशमुखांना सांगितलं जात होतं की तुम्ही तुम्ही पक्ष बदला, विचार बदला आणि नेतृत्त्व बदला. परंतु देशमुख यांनी तुरुंगात जाण्याची तयारी दाखवली आणि पक्षाची साथ सोडणार नाही हे देखील ठणकावलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule warning to anil deshmukh over bjp party joining offer asc