काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अलीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. अशातच आता राहुल गांधी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर येऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. “राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांची माफी मागावी. मगच राज्यात पाय ठेवावा,” असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : “अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी…”, फडणवीसांच्या विधानावर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“वीर सावरकरांचा राहुल गांधींनी पाचवेळा अपमान केला आहे. आताही राहुल गांधींनी भूमिका बदलली नसून, माफी मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीत. उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी,” असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.
“वीर सावरकरांची अवहेलना करत इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा नाही जाणीवपूर्वक पाचवेळा अपमान करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, राहुल गांधींशी तुलना करत म्हणाले, “छोटे युवराज…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुरूवारी ( १३ एप्रिल ) भेट घेतली. त्यानंतर “विरोधी पक्षाची आघाडी मजबूत असून, आम्ही भाजपाविरोधात एकत्र लढणार आहोत. तसेच, अन्य राजकीय पक्षांशी संपर्क साधणार आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं. या राजकीय घडामोडीनंतरच राहुल गांधी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.