शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच अजित पवारांची नाराजी आणि सामनातून करण्यात आलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
“राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघणे सोडले पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी त्यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र आता आम्ही सतर्क झालो आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा विचार आता करू नये”, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. दरम्यान, जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण? असे विचारले असता, “ते भोंदूबाबा कोण, हे पूर्ण देशाला आणि राज्याला माहिती आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही”, असेही ते म्हणाले
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांची अडचण ही आहे की…”, उपमुख्यमंत्र्यांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!
यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार नाराज असल्याच्या बातम्यांसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. “अजित पवार हे नेमके काय करतील, हे कोणालाच कळू शकत नाही. ते काय बोलतात आणि काय करतात, हे अजित पवार यांनाच माहिती असतं”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “तलवार आणाच पण…” विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर सडकून टीका, युवकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप
दरम्यान, तपास यंत्राण या केंद्र सरकाच्या पाळीव प्राण्याप्रमाणे काम करतात, अशी टीका सामनातून करण्यात आली होती. त्यालाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. “उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर मैत्री केली, तेव्हापासून अशा विधाने हजारवेळा आली आहेत. त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचं याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. केवळ माध्यामात जागा मिळवण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत. सत्ता गेल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.