सुहास सरदेशमुख
शहराजवळच्या वस्त्यांमधील महिलांच्या आशा-आकांक्षांना उंचावत त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्यात पं. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राला यश मिळत असून बीड शहरातील ३४ हजार महिला रोजगारक्षम झाल्या आहेत. शहेनशाह नगरातील शेख कौसर फातिमा या वीणकामाच्या प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी बनविलेले घड्याळ सध्या दीनदयाळ जनशोध संस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
शेख कौसर फातिमा यांचे पती जामखेडमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत, तर फातिमा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य बीड शहरात भाड्याच्या घरात राहतात. चार दीर, सासू असा परिवार सांभाळताना होणारी ओढाताण दूर व्हावी म्हणून त्यांना कोणतेतरी एक कौशल्य मिळवायचे होते. परंपरागत वीणकामातून त्यांनी अनेक वस्तू बनविल्या. वस्तीमध्ये राहणाऱ्या आठवी-दहावी शिकलेल्या अनेक मुलींना त्यांनी कसेबसे वीणकामाचे प्रशिक्षण दिले. त्यातून शिफा पठाण यांनीही शिक्षण घेतले. त्यांनी आता वीणकामातून घड्याळ बनविले आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य प्रशिक्षण केंद्रातील प्रमुखांना भेट दिले. हे घड्याळ त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
शहरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये स्वत:चा, कुटुंबाचा वेगाने विकास करण्याची आकांक्षा कमालीची तीव्र आहे. ही बाब हेरून जनशोध संस्थानच्या कार्यकर्त्यांनी विविध वस्त्यांपर्यंत कौशल्य विकासाच्या योजना नेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शिलाई यंत्र केंद्रस्थानी ठेवण्यात आले. त्यासाठी फॅशन डिझाइनचा एक जोड अभ्यासक्रमही ठेवण्यात आला. शाहूनगर भागात राहणाऱ्या मुक्ता कांबळे यांनी बचत गट बांधला होता. त्यांनी फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ‘शिवलेली नऊवारी साडी’ हा व्यवसाय सुरू केला. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या वाहक पतीच्या नोकरीतून पैसे मिळणे बंद झाले हाेते, पण त्यांच्या नव्या व्यवसायाने आता कुटुंब तारले आहे.
बीड शहरातील वडार गल्लीत स्वामी नावाच्या प्रशिक्षक शिवणकामाचा वर्ग घेतात. तो अभ्यासक्रम शिकण्यासाठी या वस्तीत अक्षरश: झुंबड उडते. बचत गटातून पैसे उभे करून दहा हजार रुपयांपासून ते ३५ हजार रुपयांपर्यंतचे शिलाई यंत्र खरेदी करण्यात आले. त्या आता एका कंपनीसाठी परकर शिवून देतात. त्यांना व्यवसाय वाढवायचा आहे. स्वस्त कपडा खरेदी करणे, त्यापासून परकर बनविणे आणि त्यांच्या विक्रीसाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत.
बचत गटातील महिलांना आता छोट्या कौशल्याची प्रशिक्षणे देत दीनदयाळ शोध संस्थान संचालित जनशिक्षण संस्थानचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. आता एका जिल्ह्यातील काही वस्त्यांमधील संख्या ३४ हजारांवर गेली आहे. वस्त्यांमधील महिलांच्या संसारातील छोट्या-छोट्या अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. शेख कौसर फातिमाच्या आयुष्यातील अवघड काळ सरू लागला आहे. इतर अनेकींच्या आयुष्यात तसा बदल घडू लागला आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे सुरू असलेल्या संस्थेतील कौशल्य विकासाचे काम आता मुस्लीम आणि दलित वस्त्यांमध्ये नवे बदल घडवून आणत असल्याचा दावा जनशोध संस्थानचे कार्यकर्ते गंगाधर देशमुख यांनी केला.
खरे तर वस्त्यांमधील महिलांमध्ये प्रगतीची मोठी आस आहे, त्यावर आम्ही काम करत आहोत. आतापर्यंत फक्त बीड जिल्ह्यातील ३४ हजार महिलांना वेगवेगळी प्रशिक्षणे देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलू लागले आहे. – गंगाधर देशमुख, दीनदयाळ जनशोध संस्थान