हर्षद कशाळकर
अलिबाग: रायगड जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रतिसाद वाढत आहे. जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.
कोकणातील शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार असल्याची चर्चा सुरू असते. सिंचन सुविधांचा भाव, अल्प भूधारणा, यांत्रिकीकरणाचा अभाव आणि शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे शेतीचे अर्थकारण जुळवणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी समूह शेतीचे प्रयत्न सुरू केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. यानंतर खोपोली आणि पेणमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून कृषी, फळ उत्पादने आणि त्यावर आधारित प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती उद्योग सुरू केले आहेत.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत या शेतकरी उत्पादक संघ कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. बाजारपेठेत असणारी मध्यस्थांची साखळी आणि त्यांची एकाधिकारशाही मोडीत काढणे हा या योजनेमागचा मूळ उद्देश होता. पेण तालुक्यात आदिती शेतकरी उत्पादक कंपनी, वनराई शेतकरी उत्पादक कंपनी, तर खालापूर तालुक्यात सुखकर्ता शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
विक्रीसाठी बाजारपेठ
खालापूर तालुक्यातील वावंढळ २५२ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुखकर्ता शेतकरी उत्पादक संघ कंपनीची स्थापना केली आहे. यात २० महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या कंपनीच्या माध्यमातून खालापूरमधील ५० एकर परिसरात केळी उत्पादन घेण्यात येत आहे. यातून दरवर्षी १ हजार टन केळी उत्पादन घेतले जात आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली केळी रॅपनिंग चेंबर पिकवून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नही वाढले आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता केळी लागवडीखालील क्षेत्र वाढविले जाणार आहे, तर केळी वेफर्स प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील करत आहे.
पेण तालुक्यातील मोहिली येथील ६०१ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वनराई शेतकरी उत्पादक संघ कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीच्या माध्यमातून ८०० एकर क्षेत्रावर नाचणी, सूर्यफूल लागवड केली आहे. यानंतर दोन्ही पिकांवर प्रक्रिया करून त्यावर आधारित उत्पादने घेतली जात आहे. सूर्यफुलापासून तेल, तर नाचणीपासून पापड उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे.
पेण तालुक्यातील शिर्की चाळ येथील ३७३ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आदिती शेतकरी उत्पादक संघ कंपनीची स्थापना केली आहे. भात, डाळ आणि मत्स्य प्रक्रिया उद्योगात ही कंपनी काम करणार आहे. कंपनीचे ६०० एकर लागवडीखालील क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर कंपनीने सुरू केलेल्या राइस मिलमध्ये प्रक्रिया केली जाते. यानंतर हा तांदूळ मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविला जातो. कंपनीकडून आता वडखळ येथे कोल्ड स्टोअरेज आणि डाळ मिल प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ४२ लाखांवर पोहोचली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री योजना यापूर्वी राबविली होती. यात तोंडली, कारली, काकडी, दुधी, वाल व इतर भाजीपाला पनवेल शहरातील सोसायट्यांमध्ये थेट विक्री केली जात होती. याला चांगला प्रतिसादही मिळाला होता आणि शेतकऱ्यांचा फायदाही झाला होता. त्यामुळे आता शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. – उमेश पाटील, आदिती शेतकरी उत्पादक कंपनी पेण
शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणाची नवी दालने उघडली आहेत. त्यांना आवश्यक प्रोत्साहन आणि मदत आम्ही देत आहोत. या तीनही कंपन्यांच्या विस्तारासाठी प्रयत्न सुरू आहेत. – सुतीश बोराडे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा