दीपक महाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षणभर डोळे मिटून चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चाचपडायला होते. आपण कुठे पडणार तर नाही ना, अशी भीती वाटते; परंतु दृष्टिहिनांसाठी त्यांच्या हातातील काठी हाच दिवा असतो. ही काठी अधिक परिणामकारक ठरावी यासाठी येथील ‘रायसोनी व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालया’तील संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी तीन हजारांत अनोखी ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे.

दृष्टिहीन व्यक्ती लाल-पांढऱ्या रंगाची काठी घेऊन चालतात. त्यांना रस्त्याने चालताना पत्ता कसा शोधावा, योग्य रस्त्याने जात आहोत की नाही, रस्त्यात काही अडथळा, खड्डा तर नाही ना अशा अनेक अडचणी भेडसावतात. हे लक्षात घेऊन रायसोनी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या लुणावत, शुभांगी पाटील आणि दुर्गेश तायडे या विद्यार्थ्यांनी दृष्टिहिनांसाठी आधुनिक काठी तयार करण्याचे ठरविले. त्यांच्या संशोधनातून अवघ्या तीन हजार रुपयांत आधुनिक काठी तयार झाली.

या काठीमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर, ऑर्डीनो बोर्ड, जंप वायर, बॅटरी, जीपीएस कंट्रोलर, कळ, वाॅटर कंट्रोलर, नऊ व्हॅटची बॅटरी आणि मायक्रो कंट्रोलर अशी सुविधा-साधने बसविण्यात आली आहेत. काठीत निर्माण होणाऱ्या कंपनांतून दृष्टिहिनांना पाच मीटरवरील अडथळ्याची माहिती मिळते. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही काठी अतिशय उपयोगाची असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल आणि रायसोनी अभियांत्रिकीचे प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी सांगितले. ही काठी तयार करण्यासाठी संगणक विभागातील प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. ही काठी टाकाऊ पाइपचा वापर करून तयार करण्यात आली आहे.

ही ‘स्मार्ट काठी’ समोरील, डावीकडील आणि उजवीकडील अडथळे ओळखू शकते. काठी कोणत्याही दिशेला वळवली तरी तिथे अडथळा असल्यास त्वरित कंपने निर्माण होतात. त्यामुळे दृष्टिहिनांना मार्गातील अडथळ्याची माहिती मिळते. या काठीत आणखी बदल करून जीपीएस आणि गजर बसविण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ही आधुनिक काठी तयार करण्यासाठी तीन हजार रुपये खर्च आला आहे. या उपकरणाचे एकाधिकार (पेटंट) मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच दृष्टिहिनांसाठी यापेक्षा अधिक चांगली आणि कमी खर्चात ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

दृष्टिहिनांना दैनंदिन जीवनात खूप त्रास सहन करताना पाहिले होते. एकदा एकाला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्या व्यक्तीला अपघात होण्याचीही भीती होती. त्यातूनच या कल्पनेचा जन्म झाला. दृष्टिहिनांना साहाय्यक ठरणारे उपकरण तयार करण्याची योजना मित्रांपुढे मांडली. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही आधुनिक स्टिक तयार केली. – ऐश्वर्या लुणावत, विद्यार्थिनी