प्रबोध देशपांडे

बुलढाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. परंतु एका बेसावध वळणावर असाध्य आजाराने त्यांना ग्रासले. मृत्यू चोरपावलांनी आपल्याकडे सरकतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली अंतिम इच्छा पत्राद्वारे मुलाकडे व्यक्त केली. त्यांच्या पश्चात त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार पुढे सरसावला आहे. सालईबनात ‘मैत्रीबन’ हे वाचन, संशोधन, पर्यावरण चळवळीचे केंद्र विकसित करण्याचा संकल्प करण्यात असून त्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपल्या जाणार आहेत. लांजेवारांच्या जयंतीदिनी ११ मे रोजी कार्यारंभ करण्यात आला. विविध चळवळीचे हे अनोखे केंद्र आता दृष्टिपथात आले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वाचन संस्कृतीचे संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी बुलढाण्याचे ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. साहित्य, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिकसह विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले. परंतु एका असाध्य आजाराने नरेंद्र लांजेवारांना गाठले. तरीही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चळवळीच्या कार्यात खंड पडू दिला नाही. मृत्यूची चाहूल त्यांना लागली होती. त्यामुळे लांजेवार यांनी मुलगा मकरंद याला पत्र लिहून आपल्या अंतिम इच्छा व भावना व्यक्त केल्या. हे भावनिक पत्र खूप चर्चिले गेले, जनमन हळहळले. त्याच पत्रात नरेंद्र लांजेवारांनी, ‘सालईबनात पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, तीच माझी समाधी समजावी,’ असे लिहिले होते. आयुष्याच्या नंतरही त्यांनी समाजाच्या भल्याचाच विचार केला. १३ फेब्रुवारीला नरेंद्र लांजेवार यांचे निधन झाले. बुलढाणा, खामगाव आदी ठिकाणी झालेल्या श्रद्धांजली सभेतच त्यांचे कार्य, चळवळ पुढे अविरतपणे सुरूच ठेवण्याचा वसा मित्रपरिवार व स्नेही जणांनी घेतला. नरेंद्र लांजेवारांच्या अंतिम इच्छेनुसार सालईबनात ‘मैत्रीबन’ निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. अनेकांचे स्वयंस्फूर्तीने ‘मैत्रीबन’साठी योगदान मिळत आहे.

नरेंद्र लांजेवार यांचे कुटुंबीय व चाहत्यांच्या उपस्थितीत प्रस्तावित ‘मैत्रीबन’चे संकल्पचित्र तयार करून वृक्षपूजन, वृक्षांना पाणी घालून त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. ‘मैत्रीबन’मध्ये पुढील चार महिन्यांत श्रमदानातून प्रवेशद्वार, शिल्प, ग्रंथ प्रतिकृती, विचारमंच, ग्रंथालय, वाचन-लेखन व संशोधन कक्ष, प्रशस्त लॉन, फुलझाडांची लागवड, लॅन्डस्केप व नरेंद्र लांजेवार यांचे भव्य पोर्ट्रेट आदी बाबींचे निर्माण कार्य होणार आहे. लांजेवार यांच्या कल्पनेतील वाचन संस्कृती व पर्यावरण संवर्धनासाठी संकल्पित ‘मैत्रीबन’ साकारण्यात येत आहे. यासाठी कुटुंबीय प्रज्ञा लांजेवार, मकरंद लांजेवार, मैत्री लांजेवार, तरुणाईचे मंजितसिंह शीख, डॉ. गणेश गायकवाड, अरविंद शिंगाडे, रविकांत तुपकर आदींसह असंख्य मित्रपरिवार व स्नेही जण परिश्रम घेत आहेत.

‘मैत्रीबन’ उपक्रमासंदर्भात बोलताना गझलकार, कवी डॉ. गणेश गायकवाड म्हणाले, ‘नरेंद्र लांजेवार यांनी सुरू केलेले वाचन, पर्यावरण, संशोधन आदींचे कार्य अविरतपणे सुरू राहण्यासाठी ‘मैत्रीबन’ उभारण्यात येत आहे. या ठिकाणी वैचारिक खाद्य मिळेल. वैचारिक आदान-प्रदान होण्याच्या दृष्टीने आगामी काळात व्याख्यानमाला आयोजनाचा देखील आमचा प्रयत्न राहील.’ वाचन, पर्यावरण, जैवविविधता, वैचारिक चळवळीचा एक अनोखा संगम ‘मैत्रीबन’मध्ये राहणार आहे, असे अरविंद शिंगाडे यांनी सांगितले. नरेंद्र लांजेवार यांच्या संकल्पनेतील वाचन संस्कृतीचे राज्यातील एक मोठे केंद्र ‘मैत्रीबन’च्या माध्यमातून निर्माण होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

वाचन संस्कृतीला चालना मिळणार

लांजेवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सालईबनच्या निर्मितीसाठी ‘तरणाई’ला सदैव प्रोत्साहित केले. सातपुड्याच्या पायथ्याशी ७१ एकरांत २५ हजारांवर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्यात आले. उजाड जमिनीवर वनराई फुलवली. आता या वनराईत ‘मैत्रीबन’च्या माध्यमातून वाचन, संशोधन, पर्यावरण चळवळीला चालना मिळणार आहे.

नरेंद्र लांजेवार यांचा विविध क्षेत्रांत वावर होता. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली. लांजेवार यांच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य मित्रपरिवार करणार असून ‘मैत्रीबन’ अतिशय उत्तमपणे फुलवणार आहोत. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. – रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुलढाणा

Story img Loader