सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष मुला-मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रह दूषित आहे. तो बदलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती नेटाने कृतिशील उपक्रम राबवत आहेत. ही विशेष मुले-मुलीही सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात. त्यांचे व्यक्तिमत्त्वही इतरांप्रमाणे विकसित होऊ शकते आणि त्यांच्या कौशल्यातून उत्पादनही घेता येते, हे उस्मानाबादच्या स्वाधार बालिकाश्रमाने ते सिद्ध केलं आहे.

विशेष सबल मुलींमध्ये बदल घडवून स्वाधार या गतिमंद मुलींच्या आश्रमात या मुलींच्या मदतीने तेलाचा घाणा चालविला जातो. शेंगदाणे मोजून देणे, तेलाच्या बाटल्यांवर लेबल चिकटविणे अशी कामे या मुली करत आहेत. बालिकाश्रमातील ११० मुली वेगवेगळ्या प्रकल्पांतून एक लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करत आहेत. ‘स्वाधार’ हे बालिकाश्रमाचे नाव सार्थ ठरविण्यासाठी या मुलींनी गेली चार वर्षे कमालीची मेहनत घेतली आहे.

मधाचे बोट आणि गाणं

उस्मानाबाद शहराजवळील विमानाच्या धावपट्टीजवळ हे बालिकाश्रम आहे. रस्त्यावर फेकलेल्या, अनाथ मुलींचा सांभाळ करणाऱ्या शहाजी चव्हाण यांनी हा प्रकल्प सुरू केला तेव्हा मुलींचा सांभाळ करणे हे मोठे जिकिरीचे होते. बहुतांश मुलींना लाळ सावरता येत नसे. त्यामुळे त्यातच बहुतांश शिक्षिकांचा वेळ जाई. मग एका शिक्षिकेला एक कल्पना सुचली. त्यातून या मुली हळूहळू लाळ सावरायला शिकल्या. त्या शिक्षिकेने मुलींच्या ओठावर मधाचे बोट फिरविले. त्यांना लाळ गोड लागू लागली आणि ती बाहेर पडू नये म्हणून मुली ती आत ओढून घ्यायला शिकल्या. पुढे या मुलींना गाणं ऐकता येऊ लागलं. त्यातील काही जणी चक्क गाणं गुणगुणू लागल्या. आता त्यांच्याकडून गाणी बसवून घेतली आहेत.

या बालिकाश्रमात भाज्या आणि फळबाग लागवड करण्यासाठी चार एकर जमीन आहे. आता मुली बागेत काम करतात. तेथे गांडुळापासून खतनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. दिवाळीत पणत्या, गणपतीच्या सुबक मूर्तीही आता संस्थेत बनवल्या जात होत्या. विशेष क्षमता असणाऱ्या मुलांच्या शाळेत असे प्रयोग अनेक ठिकाणी केले जातात.

बालिकाश्रमाचे संचालक शहाजी चव्हाण म्हणाले, की खरे तर या मुलींचा केवळ सांभाळ करणे एवढेच आमचे ध्येय होते. पण बालिकाश्रमातील विविध उपक्रमांतून मुलींचे व्यक्तिमत्त्व फुलत आहे. काही जणी शेतीकामात मदत करतात. काहींच्या हातात कमालीची जादू आहे. गणपतीच्या अतिशय सुंदर मूर्ती त्या तयार करतात. पणत्या आणि गणपती मूर्तीतून वर्षभराची एक लाखाची उलाढाल होते. पण एवढ्यावर न थांबता त्यांचा व्यावसाय सुरू राहावा असा प्रयत्न सुरू होता. करोनानंतर शुद्धतेलाची मागणी वाढल्याचे लक्षात आले. शिक्षकांनी तेलाचा घाणा सुरू केला. या व्यवसायात उपयोगी पडणारी काही कामे या मुलींकडून करवून घेतली जातात. बाटलीवर लेबल लावण्याचे काम तसे कौशल्याचे असते. पण आता तेही काम मुली करू लागल्या आहेत. त्यांना आधार मिळेल असे उपक्रम यापुढेही आखणार आहोत.’

या बालिकाश्रमातील काही मुली आता वयाने मोठ्या आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न जटिल आहेत. पण शाळेतील महिला शिक्षिका त्या हाताळत आहेत. गेल्या दोन वर्षांत- करोनाकाळात या मुलींना सांभाळताना, शिक्षक-कर्मचाऱ्यांनी १५-१५ दिवस मुक्काम करून मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले.

खरे तर उस्मानाबाद हा दुष्काळी भाग. बहुतांश उघडे बोडके डोंगर. त्यामुळे या भागात झाडे लावली जावीत, ती जोपासली जावीत म्हणून आता रोपवाटिकाही विकसित केली जात आहे. बियांच्या राख्या तयार करण्याची कल्पनाही शिक्षिका आणि मुलींनी राबवली. करंजसह विविध प्रकारच्या बियाण्यांच्या राख्या तयार करण्यात आल्या. या कामात मुली रमतात. विशेष मुले एकच एक काम करायला कंटाळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील क्षमतांचा योग्य उपयोग करून घेत त्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे संस्थेचे मुख्याध्यापक गुरुनाथ थोडसरे यांनी सांगितले.

क्षमतेचा पुरेपूर उपयोग

सर्वसाधारण मुलांप्रमाणे विशेष मुले एकच काम पुन्हा-पुन्हा करण्यास कंटाळत नाहीत. एकाच कामात तासनतास रमण्याच्या या त्यांच्यातील क्षमतेचा पुरेपूर उपयोग बालिकाश्रमातील शिक्षिका आणि कर्मचारी करतात. बियांच्या राख्या तयार करणे, मूर्ती, पणत्या बनवणे, बागकाम करणे अशी अनेक कामे विशेष मुली कुशलतेने करतात. काही मुलींच्या हातात तर जादू आहे.