रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोना संकटकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन साकारले आहे. संगमेश्वरातील काही दूरदृष्टीच्या व्यापाऱ्यांनी स्वातंत्र्यापूर्वी १९२९मध्ये स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेत एकविसावे शतक सुरू झाले तरी स्वतंत्र कला वर्ग नव्हता. ही उणीव दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असता तत्कालीन संस्थाचालकांनी शाळेलगत असलेली डोंगरउताराची जागा देऊ केली. मात्र आर्थिक बळाअभावी तेथे वर्ग बांधण्याबाबत असमर्थता दर्शवली. पण शाळेचे मुख्य कला शिक्षक जे. डी. पराडकर यांनी ही एक मोठी संधी मानून कलेची आवड असणाऱ्या मुलांना एकत्र केले आणि स्वतंत्र कला वर्गाची गरज आणि महत्त्व पटवून दिले. त्यानंतर मुलांनी शनिवार-रविवारी सुट्टी न घेता श्रमदान करून प्रथम जागेची समपातळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थापत्य अभियंता असलेली शाळेची माजी विद्यार्थिनी मनीषा रहाटे हिने कर्तव्य भावनेतून इमारतीचा आराखडा तयार करून दिला. तिनेच रेखाटलेल्या एका चित्राचा दर्जा पाहून मुंबईतील एका संस्थेने एक लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे कला वर्गाच्या बांधकामाने वेग घेतला. स्थानिक व्यापाऱ्यांसह, माजी विद्यार्थी, उद्योजक असे अनेक मदतीचे हात पुढे आले आणि जेमतेम वर्षभरात स्वतंत्र दुमजली देखणी इमारत उभी राहिली.

शासनाच्या रेखाकला परीक्षेसाठी या कला वर्गात मुलांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला. या मार्गदर्शन वर्गामुळे रेखाकला परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. दहावी – बारावीनंतर कलाशिक्षण घेण्याचा कल वाढून पैसा फंडसह आजूबाजूच्या शाळांतील मुले येथे प्रवेश घेऊ लागली. या वर्गाचा वरचा मजला प्रात्यक्षिकांसाठी तयार करण्यात आला. येथे मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच कोकणच्या विविध भागांतील नामवंत कलाकारांची प्रात्यक्षिके आयोजित केली जाऊ लागली.

या वर्गाचे कला दालनात रूपांतर करण्याचा मानस होता. मात्र निधी आणि चित्रे – शिल्पे जमवणे हे पुन्हा मोठे आव्हान होते. त्या दृष्टीने संधी शोधत असतानाच २०१९मध्ये करोना महासाथीचा उद्रेक झाला. प्रशालेत विद्यार्थी येत नसल्याने आता या वेळेचा उपयोग कसा करायचा? यातूनच ‘पैसा फंड कला दालन’ या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

प्रशालेतील कला पदवीधर माजी विद्यार्थी हेमंत सावंत, प्राची रहाटे आणि स्नेहांकित पांचाळ हे विद्यार्थी पुढे आले आणि कला दालन साकारू लागले. येथील विद्यार्थ्यांनी पूर्वी केलेले काम लक्षात घेऊन देणगीदारांनी पुन्हा उदार हस्ते मदत केली आणि या सर्व प्रयत्नांमधून अतिशय प्रेक्षणीय कला दालन आकारास आले. या दालनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली फायबरची ९ फूट उंच पेन्सिल आणि दालनातील भिंतीवर साकारलेले थ्री डी पेंटिंग या प्रकल्पामागील कल्पकता आणि भव्यता प्रभावीरीत्या व्यक्त करते.

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या १५ महिन्यांच्या काळात ७० कलाकृती, १० शिल्पे जमा करून त्यांना फ्रेम करणे, पेडलस्टल बनवणे इत्यादी कामे अक्षरशः झपाटल्यासारखी पूर्ण करण्यात आली. या सर्व कलाकृती या दालनात झळकत आहेत.

मुंबई-पुण्यासह विविध शहरांतील पर्यटक हे कला दालन पाहून या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करत आहेत. पर्यटकांसह कलारसिकांनी ग्रामीण भागातील कलाकारांची ही कला पाहावी आणि या कलाकारांना एक व्यासपीठ मिळून त्यांच्या कलाकृतींची विक्री व्हावी, हाही या कला दालनाचा महत्त्वाचा उद्देश आहे, असे पराडकर यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या या कलासेवेची दखल घेऊन मुंबई येथील आर्ट व्हिजन ग्रुपतर्फे नुकतेच या कला दालनाला राजा रवि वर्मा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

कलाकृतींचा वार्षिकांक…

प्रशालेच्या कलाविभागाने सन २०००मध्ये ‘कलासाधना’ हे चित्रकला वार्षिक सुरू केले. पाचवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तम कलाकृती एकत्र करून दरवर्षी २६ जानेवारीला या ‘कलासाधना’ चित्रकला वार्षिकचे प्रकाशन केले जाते. कलासाधनात आपली कलाकृती लागावी म्हणून मुलांमध्ये परस्परात स्पर्धा निर्माण झाली. याबरोबरच प्रशालेकडे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा मोठा संग्रह तयार झाला.

हेही वाचा : चांगभलं : ‘ग्रामायण’च्या स्वदेशी प्रयोगातून महिला आत्मनिर्भर. शेणापासून खत, गोमूत्रापासून विविध उत्पादन निर्मिती

गेली २२ वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे आणि यामधून प्रशालेच्या कला विभागाकडे सुमारे बाराशे कलाकृतींचा संग्रह झाला आहे. विशेष म्हणजे करोनाकाळात सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांनी घरून कलाकृती पाठवल्याने या उपक्रमात खंड पडला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changbhala story of paisa fund high school art gallery in ratnagiri amid corona situation pbs