हर्षद कशाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : निसर्गचक्रात स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेला गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी कोकणात मोठ्या प्रमाणावार आढळणारा हा पक्षी दुर्मीळ होत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील चिरगाव येथे सिस्केप संस्था आणि वन विभागाच्या सहकार्याने गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

कोकणात १९९२ ते २००७ या काळात गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आढळले. वाढते शहरीकरण आणि कुपोषण ही यामागची प्रमुख कारणे होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशिया खंडात अत्यंत दुर्मीळ समजली जाणारी पांढऱ्या पाठीची गिधाडे कोकणात अजूनही आढळतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन, सिस्केप संस्था आणि वन विभाग यांच्या सहकार्यातून म्हसळा तालुक्यातील चिरगाव जंगलात गिधाड संवर्धन प्रकल्प राबविला जात आहे.

कुपोषणामुळे दगावणाऱ्या गिधाडांचे संवर्धन करणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास वाढवणे हा या प्रकल्पामागचा मूळ उद्देश आहे. म्हसळा तालुक्यातील चिरगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील जासवली येथील जंगलात गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यातील चिरगाव येथील प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी ज्या परिसरात गिधाडांची एखाद-दुसरी घरटी दिसून येत होती. तिथे आज ३० ते ३५ घरटी आढळत आहेत. गिधाडांची परिसरातील संख्या ८० हून अधिक झाली आहे. तर श्रीवर्धन म्हसळ्याच्या आसपासच्या परिसरातही गिधाडांची संख्या वाढीस लागली आहे. देशविदेशातील पक्षीनिरीक्षकांसाठी चिरगावचा गिधाड संवर्धन प्रकल्प महत्त्वाचे अभ्यास केंद्र ठरत आहे.

कुपोषण ही गिधांडांची संख्या कमी होण्यामागचे मूळ कारण होते. त्यामुळे कुपोषण रोखणे गरजेचे होते. पूर्वी गावाबाहेर मृत जनावरे टाकण्यासाठी ढोरटाकी असायची. मात्र ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात झाल्यानंतर ढोर टाक्या बंद झाल्या. मृत जनावरांना पुरणे अनिवार्य झाले. त्यामुळे गिधाडांचे कुपोषण वाढले. गिधाडांची संख्या कमी होत गेली. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गावात ढोरटाकी संकल्पना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनी ढोरटाकीवर टाकलेली जनावरे या प्रकल्पाअंतर्गत जंगलात टाकण्यात आली. यामुळे गिधाडांचे कुपोषण कमी झाले आणि त्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. महाड आणि श्रीवर्धनमधील वन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी या प्रकल्पासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे गिधाड संवर्धनाला पाठबळ मिळाले.

स्वच्छकाच्या भूमिकेत…

मृत जनावरांच्या विघटनप्रक्रियेत गिधाड महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखले जाते, मात्र वाढत्या शहरीकरणामुळे गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आशिया खंडात प्रामुख्याने लांब चोचीची, बारीक चोचीची आणि पांढऱ्या पाठीची गिधाडे आढळत असत. यातील पांढऱ्या पाठीची गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

काही वर्षांपूर्वी पक्षी निरीक्षक प्रेमसागर मिस्त्री यांना म्हसळा तालुक्यातील देहेन येथे गिधाडांची काही घरटी आढळून आली होती. मात्र त्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले. यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसरात गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गिधाड संवर्धनासाठी दरवर्षी शासन मोठा खर्च करते. हरयाणा, पश्चिम बंगाल आणि आसाम येथे गिधाड संवर्धन केंद्रे आहेत. पण गिधाडांचा नैसर्गिक अधिवास आढळणाऱ्या कोकणात मात्र गिधाड संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गिधाडांचा नैसर्गिक अधिवास वाढवला आणि कुपोषण दूर केले आणि स्थानिकांमध्ये जागृती केली तर सकारात्मक परिणाम दिसून येतील. – प्रेमसागर मेस्त्री, प्रकल्प संचालक, सिस्कॅप, गिधाड संवर्धन प्रकल्प

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changbhala success in vulture breeding in raigad district asj