विश्वास पवार
वाई : मांढरदेवी डोंगराच्या पायथ्याला व पांडवगडाच्या उत्तरेला डोंगरउतारावर गुंडेवाडी (ता. वाई) गाव वसले आहे. कायम पाणीटंचाई असलेल्या या गुंडेवाडीतील हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावातील युवकांनी पाणी अडवण्याचा निश्चय केला. शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावाजवळच्या डोंगरावर स्वखर्चातून शेकडो खड्डे, चर खोदले. ओढ्यावर असलेले छोटे बंधारे, पाझर तलावांची दुरुस्ती आदी कामे केली. पाहता पाहता ही कामे श्रमदान आणि वर्गणीतून पूर्ण झाली आणि गेल्या पावसाळ्यापासून पाणी अडू लागले. गावच्या जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि आता गावचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.
गुंडेवाडी (ता. वाई) गावचा हा सगळा डोंगराळ दुर्गम परिसर. दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या पावसात गावाजवळच्या मांढरदेव डोंगरातून धबधबे भरभरून वाहतात. परंतु पावसाळ्यात पडणारे हे सारे पाणी या चार महिन्यांतच ओढ्या-नदीला वाहून जाते. पावसाळा संपला की उन्हाळ्याच्या सुरुवातीला फेब्रुवारीपासून ते जूनमध्ये पुढचा पाऊस होईपर्यंत गाव पाण्याच्या शोधात धावत असते.
दरवर्षी भेडसावणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी गावातील तरुण गेल्या वर्षी एकत्र आले. त्यांनी सरकारी योजनेची वाट न पाहता आपणच यावर उपाय शोधण्याचे ठरवले. संघटित झाले, त्यांना मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी गाव परिसरात, डोंगर उतारावर सर्वत्र शेकडो खड्डे, चर खोदले. छोटे बंधारे, पाझर तलावांची दुरुस्ती आदी कामे हाती घेतली. शिवकालीन तळी श्रमदानातून मातीगाळापासून मुक्त केली गेली. छोटे छोटे तलाव गाळमुक्त केले. श्रमदानातून गावाच्या परिसरातील डोंगर उतारावर पाणी अडविण्यासाठी खड्डे खोदले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत तब्बल १०० हून अधिक चर खोदले गेले. पाहता पाहता ही कामे श्रमदान आणि वर्गणीतून पूर्ण झाली आणि गेल्या पावसाळ्यापासून त्यात पाणी अडू लागले. गावच्या जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि आता गावचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. यंदा उन्हाळा उलटत आला, तरी अद्याप गावात पाणीटंचाई विशेष जाणवलेली नाही. गेली अनेक वर्षे पाण्यासाठी हाल सोसणाऱ्या गावाने तरुणांच्या एकीच्या आणि कल्पकतेच्या जिवावर यंदा या टंचाई आणि त्रासावर मात केली आहे.