स्त्रियांच्या सौंदर्य स्पर्धा म्हणजे विकृती आणि अमानवीकरण असून घसरणाऱ्या नैतिक मूल्यांचे ते द्योतक आहे. मूल्यावर आधारित बदल अपेक्षित असून हा बदल म्हणजेच खऱ्या अर्थाने परिवर्तन असते. अशा परिवर्तनाची कास धरून स्त्रियांनी वाटचाल करावी, असे  मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सोलापुरातील परिवर्तन अकादमीसह राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निमूर्लन समिती, सोलापूर फिल्म सोसायटी आदी नऊ संस्था व संघटनांनी एकत्र येऊन आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘महिला जागर’च्या उद्घाटनप्रसंगी विद्या बाळ बोलत होत्या. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे कार्यवाह प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. दिशा अभ्यास मंडळ, रेल्वे महिला कर्मचारी मंडळ, हॅलो मेडिकल फौंेडेशन यांचाही ‘महिला जागर’ कार्यक्रमात सहभाग होता. उद्घाटन सत्रात प्रारंभ संयोजक सरिता मोकाशी यांनी स्वागत केले. तर अ‍ॅड. नीला मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्या बाळ म्हणाल्या, बदल व परिवर्तन या दोन्ही भिन्न संकल्पना आहेत. त्यांचे नातेही वेगळे असते. बदल हवाहवासा आणि नकोसाही वाटतो, तर जेथे मूल्यांची जपणूक होते, त्याच्या आधारावर काही बदल होत असतील तर त्याला परिवर्तन म्हणतात. परिवर्तन हे प्रेरणादायी असते. त्यातून स्त्रियांचे समाजातील स्थान निश्चित होते.
या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून ‘शिक्षणाने स्त्रियांचे प्रश्न सुटतील काय? आणि घरकामात पुरुषांचा सहभाग’ या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना विद्या बाळ यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यातील खुल्या गटात बाबा बनसोडे (प्रथम), रामकृष्ण अघोर (द्वितीय), अरुणा वर्दे (तृतीय), महाविद्यालयीन  गटात सुमय्या पटेल (प्रथम), शाम मडिवळे (द्वितीय), शैलेश पाटील (तृतीय) याप्रमाणे निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. या वेळी परिवर्तन अकादमीचे रवी मोकाशी, प्रा.विलास बेत, हॅलो मेडिकल फौंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी, मानसी मोकाशी, उपेंद्र टण्णू, पुष्पा क्षीरसागर, ॠतुजा सोनवणे, निशा भोसले आदींची उपस्थिती होती.

Story img Loader