आरोग्य विद्यापीठाची संस्थाचालक व प्राचार्यासाठी बैठक
दर्जेदार आयुर्वेद शिक्षणासाठी महाविद्यालयांनी बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष (सीसीआयएम) डॉ. वेदप्रकाश त्यागी यांनी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांचे संस्थाचालक आणि प्राचार्यासाठी आयोजित मार्गदर्शन बैठकीत केले.
व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर, आयुर्वेद व युनानी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे, परीक्षा नियंत्रक डॉ. काशिनाथ गर्कळ आदी उपस्थित होते. डॉ. त्यागी यांनी आयुर्वेद, युनानी या प्रणालीचे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी महाविद्यालयांनी सकारात्मक भूमिका घेऊन केंद्रीय परिषदेच्या नियमांप्रमाणे बदल करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा अधिक वाढण्यासाठी केंद्रीय परिषदेतर्फे नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील आयुर्वेद महविद्यालयांची स्थिती चांगली आहे. आरोग्य विद्यापीठामुळे राज्यातील महाविद्यालयांचा दर्जा सुधारत आहे. दर्जेदार शिक्षणासाठी पुढील काळामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांकडून भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या नियमांचे पालन केले जाणे गरजेचे असून तसे होत नसल्यास अशा महाविद्यालयांच्या मान्यतेबाबत अडचणी निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी दिला. महाविद्यालयांची स्थानिक चौकशी ही भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद आणि विद्यापीठ यांच्याकडून स्वतंत्रपणे न होता संयुक्तपणे घेण्याचे प्रस्तावित आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असतानाही आजाराचे प्रमाण कमी न होता त्यात वाढ होत आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या विकासाकरिता अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी विद्यापीठाच्या आवारात नक्षत्र गार्डन बनविण्यात येणार असल्याची माहिती दिली. कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्निल तोरणे यांनी केले.